
अलिबाग – आमदार गोगावले यांनी नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल वक्तव्याचे महाड येथे आज पडसाद उमटले. शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून तणाव नियंत्रणात आणला.
आमदार गोगावले यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने महाड येथे आंदोलनाची हाक दिली होती. याची भनक लागताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिवाजी महाराज चौकात जमले होते. दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावबंदी लागू असल्याचे सांगत आंदोलकांना परतण्याच्या सुचना केल्या. पण ठाकरे गट आपल्या कार्यालयाकडे परतत असतानाच दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीशंकर काळे यांनी शिघ्रकृती दलाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.