देवरी,ता.२६ : आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित वनहक्क पट्ट्याचे प्रस्तावावर त्वरित निर्णय घेऊन ते पट्टे वितरित करण्यात यावे, अशी मागणी या क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना सोमवार (ता.२४ जून ) रोजी एका निवेदनातून केली आहे.
जंगलाच्या आजूबाजूला राहणारे तसेच त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबासाठी वनहक्क पट्टे कायदा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी व आदिवासी बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावी. ज्यांनी पट्ट्या संदर्भात प्रस्ताव सादर केले आहेत त्यांचे प्रस्ताव लवकर निकाली काढून त्यांना वनहक्क पट्टे वितरित करावे, वनदाव्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा. जेणेकरून संबंधितांना अनेक योजनांचा लाभ घेता येईल. वनहक्क पट्टे देताना थोड्याफार किरकोळ कारणांमुळे फार मोठ्या संख्येतील शेतकऱ्यांचे वनहक्क पट्टे जिल्हास्तरावर अडून आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना वनहक्क त्वरित देण्यात यावे, अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून आमदार कोरोटे यांनी केली.
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात विलास भोगारे, धोंडू आचले, कलिराम काटेंगे, ध्रुपराम फुलकुवर, रमेश मडावी, मधू मारगाये, शिवाजी खोब्रागडे, राजाराम पेटकुले, संदीप मोहबिया, कमलेश पालिवाल आदींचा समावेश होता.