चरण वाघमारे यांच्या हाती राष्ट्रवादीची तुतारी

0
122

तुमसर –विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आज मुंबई येथे शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता चरण वाघमारे हे तुमसर विधानसभा मतदारसंघातून तूतारी हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार असलेल्या चरण वाघमारे यांनी यापूर्वी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. मात्र आंध्र प्रदेशात सत्ता बदल झाल्यानंतर बीआरएसचे भवितव्य धोक्यात आले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणूक माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी चरण वाघमारे हे काँग्रेसचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र काँग्रेसमधील काही लोकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. दरम्यान येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघमारे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. ते अपक्ष निवडणूक लढतील असे वाटत असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या संपर्कातही ते होते. अखेर आज मुंबई येथे त्यांनी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी वाघमारे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वाघमारे यांच्या या प्रवेशामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. असे झाल्यास दोन राष्ट्रवादींमध्ये या ठिकाणी लढत होणार हे स्पष्ट आहे.