नक्षलवादी संविधानाला मानत नाही; भाजपलाही संविधान संपवायचे आहे – छत्तीसगड माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

0
59

नागपूर : नक्षलवादामुळे सर्वाधिक नुकसान काँग्रेसचे झाले आहे. आमचे पहिल्या फळीतील नेते शहीद झाले. जे भाजपचे लोक आम्हाला नक्षली संबोधतात त्यांचे नक्षलवाद्यांमुळे काहीच नुकसान झाले नाही. नक्षलवादी भारतीय संविधानाला मानत नाहीत आणि भाजपलाही संविधान संपवायचे आहे. संविधानाच्या मुद्यांवर नक्षलवादी आणि भाजपमध्ये समानता आहे, असा जोरदार हल्ला छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी भाजपवर केला. भूपेश बघेल नागपूर प्रेस क्लब आयोजित पत्रकार परिषेदत बोलत होते.

उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडील लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेल्या संविधानाच्या प्रतिबाबत आक्षेप घेतला होता. त्यावरही बघेल यांनी भाष्य केले. ते म्हणाले, देवीच्या दुपट्टयाचा रंग लाल, भगवान हनुमान यांचा रंग लाल, उगवता आणि माळवता सूर्य लाल असतो. मग, फडणवीस यांना लाल रंगाचा इतका त्रास का होत आहे? त्यांची मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अशी पदावनती झाल्याने ते नैराश्यात आहेत.त्यामुळे फडणवीस वाट्टेल ते बोलत सुटले आहेत. राहिला प्रश्न त्यांनी केलेल्या नक्षलवादाच्या आरोपाचा तर नक्षलवादामुळे सर्वाधिक नुकसान काँग्रेसचे झाले आहे. आमचे पहिल्या फळीतील नेते शहीद झाले. माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल, काँग्रेसचे तत्कालिन प्रदेश अध्यक्ष नंद कुमार पटेल, बस्तर टायगर महेंद्र कर्मा यांच्यासह काँग्रेसचे २९ लोक शहीद झाले. जे भाजपचे लोक आम्हाला नक्षली संबोधतात त्यांचे नक्षलवाद्यांमुळे काहीच नुकसान झाले नाही. नक्षलवादी भारतीय संविधानाला मानत नाहीत आणि भाजपलाही संविधान संपवायचे आहे.संविधानाच्या मुद्यांवर नक्षलवादी आणि भाजपमध्ये समानता आहे, असा जोरदार हल्ला भूपेश बघेल यांनी भाजपवर केला.

‘लाडकी बहीण’ योजना काँग्रेसचीच
काँग्रेसने लाडकी बहीणसारखी योजना हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुरू केली आहे. आम्ही जेव्हा ही योजना सुरू केली, तेव्हा भाजपचे लोक या योजनेस ‘रेवडी’ म्हणून हिणवत होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपला जोरदार धक्का दिला. त्यानंतर भाजपने या योजनेची नक्कल केली. महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यानंतर ही योजना यशस्वीपणे चालवण्यात येईल, असेही बघेल म्हणाले.