
मुंबई:-:-कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील चार महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. युती अथवा आघडीचं मी पाहतो, त्या भरवशावर तुम्ही राहू नका, असे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची चर्चा होणार असल्याचे समोर आले होते. राज ठाकरेंनी साद दिल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. ठाकरे बंधू एकत्र येतील,अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू होती. पण एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही राज ठाकरंना युतीसाठी विचारण्यात आल्याचं म्हटले जाऊ लागले. पण अद्याप ठाकरे अथवा शिंदे यांच्यासोबत युतीबाबत अधिकृत बैठक झाल्याचे समोर आलेले नाही. आता त्यातच मनपा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे राज ठाकरेंनी युती-आघाडीच्या पुढे जात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना ठाकरे गट अथवा इतर कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका. युती आणि आघाडीचे काय करायचं ते मी पाहतो. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. राज ठाकरेंच्या आदेशानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनामध्ये उभी फूट पडली. त्याआधी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकते, असे लोकांना वाटत होते. या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, असे कार्यकर्त्यांना वाटत होते.