भाजपा नगरसेवक महेंद्र निंबार्तेचा काँग्रेस पक्षात प्रवेश

0
14

भंडारा,दि.१९-भंडारा जिल्ह्यातील सक्रिय युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चौहाण, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश महासचिव रामकिशन ओझा, ऍड गणेश पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रदेश महासचिव डॉ. बबनरावजी तायवाडे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर,  माजी आमदार सेवक वाघाये, प्रदेश सरचिटणीस जिया पटेल, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रफुल्ल गुढघे पाटील, मुजीब पठाण, आसवारीताई देवतळे, प्रमोद तितिरमारे, प्रमिला कुटे, मनोहर सिंगनजुडे, सीमाताई भुरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
  १९९४ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश घेऊन त्यांनी विदयार्थी चळवळीत सक्रिय भूमिका निभावली. १९९८ ते २००५ पर्यंत अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर महानगर,नागपूर जिल्हा,यवतमाळ तसेच वाशीम या जिल्ह्यांमध्ये संघटनमंत्री म्हणून कार्य केले. त्यांनी विविध कार्यकारणी वर काम केले. विदर्भ प्रदेश शिक्षा प्रकोष्ठाचे पाच वर्ष भरीव कार्य केले. अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड तसेच प्रदेश सहमंत्री म्हणून निवडीमुळे त्यांनी यादरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्दितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग शिक्षित स्वयंसेवक सुद्धा आहेत. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले महेंद्र निंबार्ते २००५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले. युवा सदस्य म्हणून त्यांनी विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर विद्यापीठाला नेहमीच धारेवर धरले. याशिवाय विद्यार्थी कल्याण हे केंद्रबिंदू मांडून शिक्षणक्षेत्रात कार्य केले. २०११ मध्ये दुसऱ्यांदा सिनेट सदस्य म्हणून निवडून येण्याचा मान पटकाविला. यातूनच पुढे ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवडून आले. व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी कल्याणाच्या दृष्टीने विविध योजना मंजूर करून घेतल्या तसेच विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यास बाध्य केले. समाजातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांना शासकीय, विद्यापीठाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी लढा दिला. विद्यार्थी सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत मिळवून  दिली. २०११ मधेच भंडारा नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग पाच मधून नगरसेवक या पदावर निवडून आले. याशिवाय त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिव व भाजयुमोच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. आपल्या कार्याने युवकांच्या मनात अढळ स्थान मिळवून त्यांनी पदवीधरांची प्रतिनिधी म्हणून नाव लौकिक मिळविला आहे. सध्या ते वाईल्डलाईफ प्रोटेक्शन फोर्स ऑफ विदर्भ चे अध्यक्ष सुद्धा आहेत.