भंडारा दि.१५: नगरपरिषद भंडाराच्या सहा सभापतीपदांच्या पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात शिक्षण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या जयश्री रविंद्र बोरकर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी वनिता दिलीप कुथे, नियोजन व विकास समिती सभापतीपदी भूमेश्वरी मनोज बोरकर, महिला व बालकल्याण समिती सभापती आशा हरिश्चंद्र उईके व स्वच्छता वैद्यक व आरोग्य समिती सभापतीपदी ब्रिजमोहन फत्तूलाल कटकवार यांची निवड करण्यात आली.नगरपरिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) विजया बनकर, नगराध्यक्ष सुनिल मेंढे व मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या उपस्थितीत सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.भंडारा नगरपालिकेच्या एकुण ३३ नगरसेवकांपैकी भाजपचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, काँग्रेसचे ३ तर अपक्ष ४ सदस्य आहेत. यापैकी काँग्रेस व अपक्ष सदस्यांनी भाजपला पाठींबा दिला आहे.
सभापती पदावर निवड झालेल्या वनिता कुथे, भूमेश्वरी बोरकर, आशा उईके, ब्रिजमोहन कटकवार हे सदस्य भाजपच्या शिक्षण समिती सभापतीपदी वर्णी लागलेल्या जयश्री बोरकर या काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी नियमाप्रमाणे उपाध्यक्ष कवलजितसिंह चढ्ढा यांची निवड करण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदाकरिता गीता सुरेश सिडाम यांची निवड करण्यात आली आहे.