Home राजकीय भाजपचा स्थापनादिवस रस्त्यावर,गोरेगावात कार्यालयाला कुलूप

भाजपचा स्थापनादिवस रस्त्यावर,गोरेगावात कार्यालयाला कुलूप

0

गोरेगाव,दि.०६(berartimes.com)-भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज गुरुवारला(दि.६) गोरेगाव तालुक्यातच नव्हे तर देशभर साजरा करण्यात येत आहे.हा कार्यक्रम तालुकास्थळी भाजपचे ज्याठिकाणी कार्यालय आहे,त्याठिकाणी करण्यात येतो.परंतु गोरेगाव तालुक्यात गेल्या अनेकवर्षापासून बसस्थानक परिसरात असलेल्या भाजप कार्यालयाला गेल्या दोनतीन दिवसापुर्वी घरमालकाने थकीत भाडे न मिळाल्याने कुलूप ठोकल्याने भाजपच्या गोरेगाव कार्यकारिणीला मात्र रस्त्यावर स्थापना दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याची वेळ आली.गोरेगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात जेव्हापासून आला तेव्हापासून चौकातील बसस्थानकासमोरील बिसेन यांच्या घरी कार्यालय सुरु करण्यात आले.त्या कार्यालयातच बैठका व्हायच्या.कुणी पक्षाचा वरिष्ठ नेता सुध्दा आला तरी तिथे भेट द्यायचा.त्याच कार्यालयाला मात्र भाडे न मिळाल्याने कुलूप ठोकण्याची वेळ सत्तेत असताना भाजप आल्याने चर्चांना पेव फुटले आहे.विशेष गोंदिया जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष हे गोरेगाव तालुक्याचे माजी आमदार.त्यातच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचाही मतदारसंघ गोरेगाव,तिरोडा मतदारंसघाचे आमदारांचेही मतदारसंघ,पंचायत समितीवर सत्ता भाजपची असे सर्व असतानाही भाजपला कार्यालयाचे भाडे न दिल्याने घरमालकाला कूलुप लावावे लागले यापेक्षा स्थापना दिनी पक्षासाठी वाईट दुसरे काहीच असू शकत नाही.
दरम्यान गोरेगाव येथे भारतीय जनता पार्टी गोरेगावच्या वतीने स्थापना दिवस पक्षाचा झेंडा फडकावून साजरा करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष डॉ लक्ष्मण भगत,जिल्हा महासचिव रविकांत बोपचे,माजी जि.प.सभापती मोरेश्वर कटरे,संजय बारेवार,व्यंकट कटरे ,जि.प.सदस्य विश्वजित डोंगरे,नगरसेवक रेवेंद्रकुमार बिसेन, मोरेश्वर रहांगडाले, पुष्पराज जंनबंधु,ऋषीपाल टेम्भरे, के टी कटरे, महेंद्र अग्रवाल, सांवलराम मारबते, मोहन ठाकरे, भूमेस्वर येळे, बी आर गौत्तम, कैलाश ताजने आदी उपस्थित होते.

Exit mobile version