Home राजकीय भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे

भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे

0

धुळे,दि.31(विशेष प्रतिनिधी) :आणीबाणीत अनेकांनी संघर्ष केला. त्याचे फळ म्हणून आज केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. मात्र पक्षवाढीसाठी, सत्ता मिळविण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, ते आज सत्तेबाहेर आहेत आणि नुकताच पक्ष स्थापन केलेले नारायण राणे यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.राजवाडे मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा यांनी संपादित केलेल्या ‘आणीबाणी – चिंता आणि चिंतनाचा विषय’ तसेच ‘डॉ़ जे़ के़ वाणी स्मृती विशेषांक’ या दोन पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
खडसे म्हणाले, आणीबाणीत नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावले गेले. देशात पुन्हा लोकशाही रूजावी, नागरिकांना त्यांचे हक्क पुन्हा मिळावेत म्हणून अनेकांनी त्या काळी संघर्ष केला. त्यांनी संघर्ष केला नसता तर आज देशात भाजपाचे १८ मुख्यमंत्री मिळाले नसते. आणीबाणी हा स्वातंत्र्यांचा दुसरा लढाच होता. मात्र आजच्या तरुण पिढीला हा इतिहास माहिती नाही. त्यांच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. यासाठी त्याचा पुस्तकांमध्ये समावेश झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

“आमच्या पक्षामध्ये असं झालंय की, ज्यांनी आयुष्य घालवलं पक्षामध्ये, ज्यांनी सत्ता आणली ते बाहेर आणि नारायण राणेंसारखी ‘त्यागी’ माणसं आतमध्ये. मी मुद्दामहून श्याम जाजू साहेबांसमोर सांगतोय.”, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

भाजप नेत्यांनाच चिमटे

ज्यांना आणीबाणीचा काळ माहिती आहे, असे मोजकेच नेते सध्या भाजपात आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षणाचीच उरल्याचा टोला लगावत एकनाथ खडसेंनी भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासमोरच स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना चिमटे काढले.

खडसेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली. भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीने आपला अहवाल सादर केला आहे. 30 जून रोजी सादर केलेल्या या अहवालात झोटिंग समितीनं खडसेंवर ताशेरे ओढले.

Exit mobile version