Home राजकीय सरकारच्या इतर योजनांसारखीच पंतप्रधान उज्वला योजना फसवी – चित्रा वाघ

सरकारच्या इतर योजनांसारखीच पंतप्रधान उज्वला योजना फसवी – चित्रा वाघ

0

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) दि.12ःः– पंतप्रधान उज्वला योजना लोकांना परवडत नसल्याने लोकांना पुन्हा चूलीवर यावे लागत आहे. सरकारची ही योजनासुध्दा फसवी असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
दरम्यान पंतप्रधान उज्वला योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना होत नसल्याचे वास्तव मांडणारी चित्रफित केल्याचीही माहिती चित्रा वाघ यांनी पुराव्यानिशी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आपल्याला रोज नवनवीन घोषणा ऐकायला मिळत असून त्याचा फायदाच जनतेला होत नसल्याचा आरोपही केला. पंतप्रधान उज्वला योजनेचे वास्तव मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या ६ जिल्हयातील महिलांशी संवाद साधला असून त्या महिलांचे दु:ख चित्रफितीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले. ही योजना लोकांना परवडत नसल्याने पुन्हा त्यांना चुलीवर यावे लागले आहे. या चुली म्हणजे रोगांना निमंत्रण असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या. जनतेने गॅस सिलेंडर कनेक्शन घेतल्यामुळे रेशनवर मिळणारे रॉकेलही सरकारने बंद केले त्यामुळे सर्रास प्लास्टीक वापरलं जात आहे.जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कनेक्शन घेण्यासाठी २०० रुपयांपासून कुठे २२०० तर कुठे ८२०० पर्यंत पैसे घेतले गेले आहेत आणि लोकांच्या माथी ही उज्वला योजना मारण्यात आल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी यावेळी केला. रिकामे सिलेंडर नेण्यासाठी आणि भरलेला सिलेंडर आणण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना १५० रुपये तर प्रवासखर्चाचे १०० रुपये मिळून १ सिलेंडरला १००० रुपये मोजावे लागतात हे वास्तव चित्रफितीमध्ये महिलांनी उघड केले आहे. अर्थसंकल्पात सांगितले गेले की ५ कोटी परिवारांना या योजनेचा लाभ झाला आणि आणखी ८ कोटी परिवारांना या योजनेचा लाभ होणार परंतु आता नक्की किती लाभ झाला आहे हे लोकंच सांगत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या फसव्या योजनेविरोधात आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आम्ही आणखी अभ्यास करू. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील वास्तव समोर आणू. आणि लोकांची खंत पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवून लोकांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. सरकारच्या इतर योजनांसारखीच ही योजनाही फसवी असून सरकारच्या फसव्या घोषणांच्या धुरामध्ये लोकांची घुसमट होत आहे असेही चित्रा वाघ म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला महिला उपाध्यक्षा सोनल पेडणेकर, डॉ.भारती पवार, प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version