Home राजकीय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी

0

नागपूर,दि.14ः- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित तांबे हे सर्वाधिक मते घेऊन प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.त्यांच्यासोबतच आमदार अमित झनक हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन उपाध्यक्ष तर त्यासोबतच कुणाल राऊत हे देखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.  साठ युवकांची प्रदेश कार्यकारणी देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तयार झाली आहे. नागपूर येथे आज युवक काँग्रेसच्या निवडीचा निकाल होता.सत्यजित तांबे यांना 70 हजार 189 मते मिळाल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित विजयी झाले. आमदार झनक 32 हजार 999 मते तर कुणाल राऊत 7 हजार 744 मते मिळवून उपाध्यक्ष झाले. सत्यजीत तांबे हे 37 हजार 190 मताधिक्याने निवडून आले.गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी आलोक मोहंती  विजयी झाले.

चंद्रपूर : अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसवर कॉंग्रेस विधीमंडळ उपगटनेते आ.विजय वड्डेटीवार गटाने कब्जा केला आहे. पाच विधानसभा अध्यक्षपद आ. वडेट्टीवार गटाने जिंकली आहे. युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्ता हरीश कोतावार यांनी नरेश पुगलिया गटाचे करण पुगलिया यांचा १०५० वर मतांनी दारूण पराभव केला. जिल्हा महासचिवपदी आ. वडेट्टीवार यांची कन्या शिवाणी वडेट्टीवार व माजी आमदार सुभाष धोटे यांचे पुतणे शंतनु धोटे मताधिक्याने विजयी झाल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेश अड्डूर, वरोरा सतीश वानखेडे, चिमूर दीपाली पाटील, ब्रह्मपुरी प्रशांत चिमूरकर, राजुरा इजाज शेख, तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून उपाध्यक्षपदी आकाश आदेवार हे निवडून आले. यामध्ये आ.विजय वड्डेटीवार यांची मुलगी चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी शिवाणी वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे यांचे पुतने शंतनु धोटे हे प्रचंड मतांनी निवडून आले. त्याचबरोबर वडेट्टीवार गटाचे हाजी इकबाल खान, सुमित चंदनखेडे हे सुद्धा महासचिव म्हणून विजयी झाले.
पक्षांतर्गत असलेल्या या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवाराव यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

Exit mobile version