
मुंबई – विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकीची लगबग सुरू असून, महिनाभरात राज्यभरात नवे चेहरे निवडण्यात येतील असे संकेत आहेत. राष्ट्रवादी भवनामध्ये पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आला.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू असल्याने पक्षसंघटना मजबूत करणे आणि विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठीची सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे. तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासह मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षाच्या निवडणुकीचाही कार्यक्रम आगामी महिन्यात पार पडणार आहे. प्रत्येक जिल्हा समितीने तालुकाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रीया पूर्ण करावी. जिथे एकापेक्षा अधिक उमेदवार असतील त्यांची यादी पक्षप्रमुखांकडे पाठवावी, असे या बैठकीत सूचित करण्यात आले. एप्रिलअखेर राष्ट्रवादीच्या नवीन तालुका आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका पार पडतील. असा कार्यक्रम या वेळी जाहीर करण्यात आला आहे.