Home Top News महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे

0

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरीभाऊ बागडे यांची एकमताने निवड झाली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे यांची निवड झाल्याची घोषणा केली.
बागडे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलांब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षाचे प्रमुख नेते हरिभाऊ बागडे यांना अध्यक्षाच्या आसनापर्यंत घेऊन गेले. विधानसभा अध्यक्षांची एकमताने निवड करण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व पक्षांचे आभार मानले.

बागडे यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करुन, फडणवीस सरकारने पहिला अ़डथळा पार केला आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला अनुकूल असलेली भूमिका तसेच संख्याबळ पाहता काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून येणे कठिण होते तशीच शिवसेनेला काही मते फुटण्याचीही भिती होती. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार मागे घेतले. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून विजयाराज औटी आणि काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते.

विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले हरिभाऊ बागडे हे सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहेत. शाळेत असताना पेपर विक्री, आमदार, मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष असा बागडेंचा आजवरचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे बागडेंच्या रूपाने सर्वसामांन्यांशी नातं सांगणारा नवा विधानसभेचा अध्यक्ष महाराष्ट्राला मिळाला आहे.

भाजपच्या हरिभाऊ बागडेंची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

सत्तर वर्षीय बागडेंची राहणी आजही अत्यंत साधी आहे. पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पोषाख. सुरूवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणा-या बागडे यांनी १९८५ साली पहिल्यांदा आमदारकीची म्हणून निवडणुक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेवर ते निवडून आलेले आहेत.

हरिभाऊ बागडे मराठा समाजाचे असून त्यांच्या निमित्ताने विधानसभेचे अध्यक्षपद मराठवाडय़ाला मिळाले आहे. १९९५ ते ९७ दरम्यान ते मंत्री होते आणि १९९७ ते ९९ दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपददेखिल त्यांनी सांभाळले. बागडे यांनी राजकारणात असूनही कधीच राजकारण न करता केवळ गुणवत्तेला महत्त्व दिले, असं त्यांचे कुटुंबिय सांगतात.

Exit mobile version