महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपचे राज्यभर ‘माझं अंगण माझं रणांगण’ आंदोलन

0
493

मुंबई,दि.22. कोरोना महामारीचे संकट राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या महामारीला रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयशी झाल्याचे सांगत राज्यातील भाजपने सरकारविरोधात आंदोलन पुकारले. ठाकरे सरकारविरोधात आपापल्या घराच्या अंगणात उभे राहून काळ्या फिती, रिबन, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले होते. ‘माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ या आंदोलनात राज्यातील भाजपच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला.कोरोना महामारीविरुद्धच्या लढ्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. संकट मोठे आहे म्हणून सहकार्य करा, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात होते. आम्ही आणि सामान्य जनतेनेही सहकार्य केले. परंतू, आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नाही, असेही पाटील म्हणाले.

गोंदिया जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले.भाजपजिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी आपल्या घरीच आंदोलन केले.तर भाजप कार्यालयात  शहर अध्यक्ष सुनिल केलनका,युवा अध्यक्ष पंकज रहागंडाले,प्रफुल अग्रवाल,संजय टेंभरे,महामंत्री दिपक कदम  संजय कुलकर्णी,नगरसेवक दिलीप गोपलानी,गोल्डी गावंडे, मनोज डोहरे, अशोक जयसिंघानी, मोंटू पूरोहीत,दीप्पल अग्रवाल हे आंदोलनात सहभागी झाले होते.भंडारा येथेही खासदार सुनील मेंढे ,मुकेश थानथराटे, अबिद सिद्धीकी, रुबी चढ्ढा, मिलिंद मदनकर, आशु गोंडाणे, मनोज बोरकर, मंगेश वंजारी, शैलेश श्रीवास्तव, विकास मदनकर, कैलाश तांडेकर, शैलेश मेश्राम,मयूर बिसेन, भूपेश तलमले, डीम्मू शेख, शुभम चौधरी, रोशन काटेखाये, अमित बिसने, अजय ब्राम्हणकर  सहभागी झाले होते. आंदोलन दरम्यान सोशल distancing, मास्क, सरकारचे अपयश दाखविणारे फलक झळकवण्यात आले.

राजकीय नेतृत्वाची हतबलता, राज्यापेक्षा स्वतच्या जीवाची भीती जास्त बाळगणे, सर्व जबाबदारी अकार्यक्षम सरकरी अधिकाऱ्यांवर टाकणे तसेच स्वत: काही न करता सतत केंद्राकडे हात दाखवून स्वतचे अवलक्षण करून घेणे ह्या आणि इतर अशा अनेक कारणामुळे हि परिस्थती ओढवली आहे असे नमूद करून खासदार सुनील मेंढे पुढे म्हणाले, ह्या पुढे तरी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या घरातून बाहेर पडून प्रत्यक्ष मैदानात उतरून राज्यातील कोरोना प्रभाव रोखला पाहिजे. तसेच तातडीने बारा बलुतेदार, हातावर पोट असणारे कामगार ह्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.

भाजपचे आंदोलन निंदनीय – शिवसेना

भाजपचे अशा प्रकारचे आंदोलन करण्याचे केलेले आवाहन हे निंदनीय आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांनी एकत्रितपणे लढून कोरोनाचा सामना करण्यास सांगत आहेत आणि दुसरीकडे राज्यातील नेते याच गोष्टीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. अशा प्रकारचे आंदोलन झाल्यास लॉकडाऊनला काही अर्थ राहत नाही.

महाराष्ट्रासाठी झटणाऱ्यांचा अपमान- जयंत पाटील

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.