Home क्रीडा ‘एचव्हीपीएम’च्या क्रीडा मंदिरातील आवश्यक सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य करू – पालकमंत्री यशोमती ठाकूर

‘एचव्हीपीएम’च्या क्रीडा मंदिरातील आवश्यक सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य करू – पालकमंत्री यशोमती ठाकूर

0

अमरावती, दि. 10 : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा क्षेत्रातील कार्य व परंपरा गौरवास्पद आहे. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमांत सातत्य राखून, संस्थेने जागतिक स्तरावरील अनेक खेळाडू घडवले आहेत. मंडळाच्या क्रीडा मंदिरातील आवश्यक सुविधा व इतरही उपक्रमांसाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  यशोमती ठाकूर यांनी  दिली.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व महाराष्ट्र हौशी जिम्नॅटिक्स संघटना यांच्या संयुक्त    विद्यमाने १६ व्या ट्रॅम्पोलिन व टम्बलिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘एचव्हीपीएम’ परिसरातील अनंत क्रीडा मंदिरात झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  आमदार सुलभाताई खोडके, मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, श्रीकांत चेंडके, माधुरी चेंडके, प्राचार्य अजयपाल उपाध्याय, जिम्नॅटिक्स संघटनेचे संजय शेटे, रवींद्र खांडेकर, पवन भोईर, नितीन पवित्रकार, राजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, खेळात हारजीत होतच असते; पण खेळात सहभागी होणे हेच सगळ्यात महत्वाचे असते. खेळाडूंनी हारजीतीचा विचार न करता खिलाडू वृत्ती जोपासून निर्धाराने वाटचाल करावी, असे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा मंदिरात आवश्यक सुविधांसाठी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आमदार श्रीमती खोडके यांनी आपल्या मनोगतातून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचा गौरव करत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. श्री. खांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी वैभव मानगुटे, अनन्या साई, आकाश धोटे, सताक्षी, अजय पहुरकर या खेळाडूंनी जिम्नॅटिक्स क्रीडा प्रकारांचे अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांना चकित केले.

श्रीमती चेंडके यांनी प्रास्ताविक केले.

Exit mobile version