गोंदिया, दि.8 : ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस भारतातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे. या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी तसेच सर्व आदिवासी सामाजिक संघटना ता. देवरीच्या वतीने मिनी मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन ९ ऑगस्ट २०२३ रोजी, बुधवारला सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
प्रकल्प कार्यालयाच्या समोरुन चिचगड रस्त्यावर ३ कि.मी. जाणे व ३ कि.मी. येणे असे एकूण ६ कि.मी.चे अंतर निश्चित केले असुन प्रत्येकी ५०० मीटरवर साधे पाणी व Glucon – D पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असुन स्पर्धेच्या वेळी बिस्कीट व फळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मॅराथॉन स्पर्धा तीन गटात होणार आहे. शालेय गट मुले व मुली १४ ते १९ वर्षे, महाविद्यालयीन गट मुले व मुली २० ते २५ वर्षे व प्रौढ गट महिला व पुरुष. या गटासाठी वयाची अट नसणार. विजेत्यांना प्रथम ७ हजार, दृतीय ५ हजार व तृत्तीय ३ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
मॅराथॉन स्पर्धा संपल्यानंतर १०.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन गोंडवाना सांस्कतिक भवन प्रकल्प कार्यालय येथे आयोजित केले असुन सदर दोन्ही कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याकरीता प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमास स्पर्धक व आदिवासी बांधवाना उपस्थित राहण्याचे आवाहन, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तसेच सर्व आदिवासी सामाजिक संघटनाच्या वतीने करण्यात येत आहे.