
संग्रामनगर दि.21-युवाशक्तीचा योग्य तो विकास करून त्यांना समाज विधायक कार्याची दिशा देऊन त्यांचा बौद्धिक व शारीरिक उत्कर्ष करण्याच्या उद्देशाने व सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने,संस्थापक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाने व मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या भव्य आट्यापाट्या क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन झाले.
या स्पर्धांचे उदघाटन महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ प्रशिक्षक,भारतीय आट्यापाट्या संघांचे सहसचिव शरद गव्हार,सोलापूर जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे,उपाध्यक्ष राजकुमार मुंबरे यांच्या शुभहस्ते मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील,दिपकराव खराडे पाटील,नितीन खराडे पाटील, शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख,माजी व्हाईस चेअरमन ॲड.प्रकाश पाटील,रामचंद्र सावंत,संचालक मल्लसम्राट रावसाहेब मगर,लक्ष्मण शिंदे, रावसाहेब पराडे,नाना मुंडफुणे, विराज निंबाळकर,रामचंद्र सिद, रामचंद्र ठवरे,गोविंद पवार,रणजित रणनवरे, बाळासाहेब देशमुख,पांडुरंग एकतपुरे,राजेंद्र भोसले,दत्तात्रय चव्हाण,श्रीकांत बोडके,धनंजय सावंत शि.प्र.मंडळाचे संचालक रामचंद्र गायकवाड,सुभाष दळवी, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्पर्धा प्रमुख यशवंत माने देशमुख यांनी केले. त्यांनी मंडळाच्या स्थापनेचा उद्देश,मंडळाचा संक्षिप्त इतिहास,कार्याचे स्वरूप स्पष्ट केले.यानंतर मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.महर्षि गीतगायनाने शब्दसुमनांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे संभाजीराव घाडगे यांनी मंडळाच्या कार्याचे व उपक्रमाचे कौतुक करून मोबाईलच्या आधुनिक युगात गुरफटलेल्या तरुणांना जुन्या पिढीतील लोंकानी ग्रामीण खेळाचे महत्व पटवून द्यावे असे आवाहन केले. त्या नंतर राजकुमार मुंबरे यांनी मंडळाने मैदानी खेळाची संस्कृती जोपासली याचे कौतुक केली असून पारंपरिक खेळाचे महत्व लक्षात घेऊन शासनाने ‘आट्यापाट्या’ या ग्रामीण खेळाचा शालेय खेळ प्रकारात समावेश करावा असे विचार व्यक्त केले.बाळासाहेब कापसे यांनी सोलापूरचा ‘आट्यापाट्या’ चा संघ जगात अग्रेसर असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे उदघाटक शरद गव्हार यांनी शिवकालीन लुप्त होत चाललेला आट्यापाट्या हा खेळ मंडळाने जागृत ठेवून त्यास योग्य सन्मान मिळवून दिला असून राज्यस्तरीय स्पर्धेचेही आयोजन करावे यासाठी राज्य संघटनेच्या वतीने सहकार्य करू असे विचार व्यक्त केले.
त्यानंतर आट्यापाट्या मैदानाचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या भव्य स्पर्धेसाठी स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून राज्यातील विविध भागातून मुंबई येथील १,उस्मानाबाद ४,माळशिरस तालुक्यातून ३९,पंढरपूर २४,माढा ६,सांगोला ४,मंगळवेढा २ अशा एकूण ८० संघांनी नोंदणी केली आहे.
या प्रसंगी मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला व ग्रामीण भागातील लुप्त होत चाललेल्या या ‘शिवकालीन’ खेळास प्रोत्साहन देण्यासाठी भरघोस अशी आकर्षक बक्षिसे जाहीर केली. यासाठी स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रु. ४४०००/-व चषक, द्वितीय क्रमांकास रु.३३०००/-, तृतीय क्रमांकास रु.२२०००/- चतुर्थ क्रमांकास रु.११०००/- तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या चार संघास प्रत्येकी रु. ५०००/- अशी एकूण १,३०,०००/- रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली.
याप्रसंगी पत्रकार,विविध शाखेचे मुख्याध्यापक,माजी खेळाडू,मंडळाचे उपाध्यक्ष पी.एस पाटील,सचिव पोपट भोसले-पाटील,खजिनदार वसंत जाधव,सर्व संचालक,सदस्य,विविध संघांचे खेळाडू व बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे समालोचन सुप्रसिद्ध ए.एम. अडसूळ,बापूसाहेब लोकरे तर उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पवार,किरण सूर्यवंशी,जाकीर सय्यद यांनी केले.उदघाट्नानंतर चूरशीचे सामने सुरू झाले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी योगदान दिले.