जिल्हास्तरीय अटल क्रिडा स्पर्धेच्या कार्यक्रमात 2 माजी खासदार,3 माजी जि.प.अध्यक्षांना डच्चू
गोंदिया,दि.21– गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाद्वारे आयोजित “अटल क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव – २०२३”चे आयोजन उद्या 22 डिसेंबरपासून येथील जिल्हा क्रिडा संकुल परिसरात करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका तयार करतांना राजकीय वास ठेवून समोर ठेवून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातच जन्माला आलेले आणि राजकीय क्षेत्रात नाव कोरलेल्या जिल्ह्यातील दोन माजी खासदार आमदारांसह तीन जिल्हा परिषद अध्यक्षांना पत्रिकेतून हद्दपार करण्याचे काम शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकार्यानी प्रकाशित केलेल्या निमंत्रण पत्रिकेवरुन बघावयास मिळाले.जेव्हा या जिल्ह्यात जन्माला न आलेले व जिल्ह्याचे रहिवासी नसलेल्या माजी लोकप्रतिनिधींना मात्र पत्रिकेत मान देण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अटल क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या पत्रिकेत विशेष अतिथी म्हणून जिल्ह्यातील सर्व माजी आमदारांना व माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना निमंत्रित केल्याचे दिसून येते.मात्र माजी आमदार व खासदार राहिलेले जिल्ह्यातील माजी मंत्री प्रा.महादेवराव शिवणकर व डाॅ.खुशालचंद्र बोपचे यांचे नाव या पत्रिकेत दिसून येत नाही.त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून विजय शिवणकर व नेतराम कटरे यांना संधी पत्रिकेत देण्यात आली असली तरी जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष एड.के.आर.शेंडे,प्रल्हाद भोयर व चंद्रशेखर ठवरे हे माजी अध्यक्ष आजही हयात असतांना यांचेही नाव वगळण्यात आले.तर माजी जि.प.अध्यक्ष सौ.उषा मेंढे या विदयमान सदस्य असल्याने त्यांचे नाव सदस्यांच्या यादीत आहे.
शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी पत्रिका तयार करतांना जिल्ह्यातील सर्वच माजी आमदार व माजी जि.प.अध्यक्षांची नावे घालणे प्रशासकीय दृष्ट्या योग्य होते.मात्र शिक्षणाधिकारी यांनी माजी खासदार व आमदार व माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना डावलून या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरुन आपली पाठ थोपाटण्याचा कार्यक्रम करुन घेतला असला तरी या राजकीय नेत्यांनी शिक्षणाधिकार्यांचे काय घोडे अडवले असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. यासंदर्भात शिक्षण व आरोग्य सभापती इंजि.यशवंत गणवीर यांना विचारणा केली असता,त्यांनी पत्रिकेसंदर्भात आपणास माहिती नसल्याचे सांगत माजीमध्ये नाव द्यायचे होते तर सगळ्यांचेच द्यायला हवे होते कारण हा शासकीय कार्यक्रम असल्याचे म्हणाले.जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य सौ.रचनाताई गहाणे यांनीही झालेला प्रकार योग्य नसल्याचे सांगितले.