
मलेशिया येथील स्पर्धेत होणार सहभागी
गोंदिया,दि.३१: गोंदिया येथील मिल्खा सिंग म्हणून ओळख असलेले ८२ वर्षीय मुन्नालाल यादव यांनी आणखी एक उल्लेखनिय कामगिरी पार पाडली आहे. नुकत्याच २१ जुलै रोजी मध्यप्रदेश राज्यातील पंचमढी येथे आयोजित १० किमीच्या मैराथान स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त करून रजत पदक पटकाविले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे गोंदियात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. विशेष म्हणजे, मुन्नालाल यादव यांनी यापुर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दुबई येथे आयोजित मैराथान स्पर्धेत सहभाग घेवून चार सुवर्ण पदक प्राप्त केले होते.
गोंदियाचे धावपटू मुन्नालाल यादव यांनी वयाची ८२ वी ओलांडली आहे. परंतु, खेळाप्रती त्यांच्यातील उत्साह काही कमी झालेला नाही. आपल्या चमकदार कामगिरीने ते नवनविन किर्तीमान रचत आहेत. या माध्यमातून ते युवकांपुढे एक आदर्श ठेवत आहेत. २१ जुलै रोजी मध्यप्रदेश राज्यातील पंचमढी येथे १० किमी मैराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुन्नालाल यादव यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतही त्यांनी आपली छाप सोडली. स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावून रजत पदक प्राप्त केले. मुन्नालाल यादव यांचे ८२ वर्ष वय होऊनही ते खेळाप्रती समर्पित भावनेने सतत दौड स्पर्धांमध्ये सहभाग घेवून चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यांची ही कामगिरी शहरातील शैकडो युवकांसाठी प्रेरणा देणारी ठरली आहे. मुन्नालाल यादव यांनी यापुर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दुबई येथे आयोजित मैराथान स्पर्धेत सहभाग घेवून चार सुवर्ण पदक प्राप्त केले होते. आगामी ऑक्टोबर महिन्यात मलेशिया येथे आयोजित स्पर्धेत ते सहभाग घेणार आहेत. उल्लेखनिय असे की, पंचमढी येथील आयोजित मैराथान स्पर्धेत गोंदिया येथील प्रसिध्द चिकीत्सक डॉ.संजय भगत यांनी २१ किमी मैराथान स्पर्धेत तर त्यांची पत्नी श्रीमती डाॅ.कविता भगत यांनी ५ किमी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
युवकांची आरोग्याकडे लक्ष द्यावे : यादव
आरोग्य ही संपत्ती आहे. त्यामुळे युवकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यायाम, दौड, खेळांकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्य सुदृढ राहिले तर वय किती झाले, याला महत्व राहत नाही. वयाच्या कोणत्याही उंबरठ्यावर नवनवे आयाम गाठत येते, असे धावपटू मुन्नालाल यादव यांनी व्यक्त केले. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था व गणमान्य नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
०००००००