जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते युवा पुरस्काराचे वितरण

0
13

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थानी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासनाकडून जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०२१-२२ ते २०२४-२५ या वर्षांमधील गोंदिया जिल्ह्याचा युवा पुरस्कार जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भय्यासाहेब बेहेरे, जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे, तालुका क्रीडाधिकारी ए. बी. मरस्कोल्हे, रवींद्र वाळके, ओमकांता रंगारी उपस्थित होते.

जिल्हास्तर युवा पुरस्कार (युवक) करिता गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम १० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०२१-२२ या वर्षाचा जिल्हा युवा पुरस्कार आमगाव तालुक्यातील ग्राम किडंगीपार येथील रविकांत रूपलाल पाऊलझगडे, सन २०२३-२४ या वर्षाचा विनेश राधेश्याम फुंडे, सन २०२४-२५ या वर्षाचा तिरोडा येथील अमन हंसराज नंदेश्वर यांना देण्यात आला. तसेच सन २०२१-२२ मधील नवजीवन ग्रामीण विकास संस्था रामजीटोला आमगाव, सन २०२३-२४ या वर्षाचा शिवछत्रपती बहुउद्देशीय विकास संस्था गोंदिया तर २०२४-२५ या वर्षाचा डीजीएम तायक्वांदो स्पोर्ट्स एज्युकेशन ॲण्ड युथ अकादमी वांढराला देण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कारात वैयक्तिक सन २०२१-२२ या वर्षाचा पुरस्कार १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तिरोडा तालुक्यातील ग्राम चुरडी येथील अंकिता अशोक सपाटे हिला प्रदान करण्यात आला. संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.