Home क्रीडा बांगलादेशने मोडला ऑस्ट्रेलियाचा 121 वर्षे जुना विक्रम

बांगलादेशने मोडला ऑस्ट्रेलियाचा 121 वर्षे जुना विक्रम

0

वेलिंग्टन(ANI), दि. 16 – क्रिकेटमध्ये दररोज नवनवे विक्रम होत असतात. प्रत्येक खेळाडू आणि संघाला असे विक्रम कायम प्रेरणा देत राहतात. मात्र खेळाच्या मैदानात असेही काही विक्रम घडतात, ज्याची आठवणसुद्धा संबंधित संघ आणि त्याच्या पाठीराख्यांना काढाविशी वाटत नाही. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही असाच एक नकोसा विक्रम बांगलादेशच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या नावे असलेला 121 वर्षे जुना विक्रम मोडीत काढत बांगलादेशने हा नवा नकोस विक्रम नोंदवला आहे.
या कसोटीच्या पाचव्या दिवशी कर्णधार केन विल्यम्सनने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. आता तुम्ही म्हणाल, त्यात विक्रम कसला, पण या कसोटीत पहिल्या डावात बांगलादेशने तब्बल 8 बाद 595 धावा कुटून आपला डाव घोषित केला होता. त्यामुळे बांगलादेशने पहिल्या डावात नोंदवलेली धावसंख्या ही एखाद्या पराभूत संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या नोंदवलेली सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. त्याबरोबरच पराभूत लढतीतील पहिल्या डावात सर्वाधित धावा फटकावण्याचा ऑस्ट्रेलियाच्या नावे असलेला 121 वर्षे जुना नकोसा विक्रमही बांगलादेशने मोडीत काढला. ऑस्ट्रेलियन संघ 1894-95 इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात पहिल्या डावात 586 धावा फटकावल्यानंतरही पराभूत झाला होता. तसेच भारताविरुद्ध 2003 साली झालेल्या अॅडलेड कसोटीतही ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावात 556 धावांचा डोंगर उभारल्यानंतरही पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. तर 2006-07 साली याच मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 551 धावा फटकावल्यानंतरही पराभूत झाला होता.

Exit mobile version