आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी वसतिगृहातील मुला/मुलींच्या क्रिडा स्पर्धा

0
56

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांचा नाविण्यपूर्ण उपक्रम
 गडचिरोली,दि.10: शासकीय आदिवासी आश्रमशाळेप्रमाणे शासकीय आदिवासी मुलां/मुलींचे खेळ होत नसल्याची खंत आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह क्र.1 गडचिरोली मधील गृहपाल रवींद्र गजभिये व विद्यार्थी यांनी डॉ. श्रीमती इंदुराणी जाखड, प्रकल्प अधिकारी यांचेकडे व्यक्त केली. प्रकल्प अधिकारी यांनी हे खेळ फक्त गडचिरोली प्रकल्पाचे न घेता गडचिरोली जिल्हयाचे घेण्याबाबत नियोजन केले. त्याकरीता गडचिरोली, कुरखेडा, अहेरी व भामरागड असे चार झोन पाडण्यात आले. विकास राचेलवार (सहायक प्रकल्प अधिकारी) व  वंदना महले (सहायक प्रकल्प अधिकारी) यांचे मार्गदर्शनात गडचिरोली झोन चे क्रिडा नैपुण्य चाचणी व सांस्कृतिक कार्यकम आश्रमशाळा रांगी येथे दि. 05जानेवारी रोजी पार पडली. वंदना महले (सहायक प्रकल्प अधिकारी) यांच्या हस्ते बक्षीस
वितरण करण्यात आले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळाला पण महत्व द्यावे. खेळामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो. विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणाला वाव मिळतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा स्पर्धेत हिरहिरीने भाग घ्यावा असे मत मांडले. क्रिडा नैपुण्य चाचणी शिबीरात आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र.01 व  आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह चामोर्शी यांना विजेता संघ घोषीत करण्यात आले. तर आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र.02 व आदिवासी
मुलींचे शासकीय वसतिगृह गडचिरोली यांना उपविजेता संघ घोषीत करण्यात आले. आदिवासी मुलां/मुलींचे शासकीय वसतिगृहातील गृहपाल रवींद्र गजभिये,  स्वाती देशपांडे, प्रशांत फरकाडे, कैलास उईके,अशोक जाधव,  गीताताई झुरमुरे,  रजनी मडावी व  माला सोनवाने यांनी क्रिडा शिबीर पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. या शिबीराचे आयोजनाकरीता आश्रमशाळा रांगी येथील मुख्यधापक श्री. रामटेके  व अधिक्षक श्री. आत्राम यांनी सहकार्य केले. प्राथमिक आरोग्य रांगी येथील आरोग्य पथक उपस्थित होते. शासकिय वसतिगृहातील मुलां/मुलींचे  प्रथमच क्रिडा स्पर्धा  होत असल्यामुळे मुलां/मुलींमध्ये प्रचंड उत्साह दिसुन आला. अशाप्रकारच्या स्पर्धा दरवर्षी  आयोजीत करण्यात यावा असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.