Home यशोगाथा यशोगाथा ;मुद्राच्या लाभामुळे सुरेश झाला स्वावलंबी

यशोगाथा ;मुद्राच्या लाभामुळे सुरेश झाला स्वावलंबी

0

गोंदिया,दि.३.-वाढत्या बेरोजगारीमुळे आज सर्वांनाच रोजगार उपलब्ध करुन देणे शक्य नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेमुळे आज अनेक बेरोजगार व गरजुंना स्वावलंबनाचा मार्ग सापडला आहे. गोंदिया शहरातील गौतमनगर येथे शितलामाता मंदिराजवळ राहणाऱ्या ५० वर्षीय सुरेश उरकुडे यांनी मुद्रा योजनेतील शिशु गटातून ५० हजार रुपये कर्ज घेवून चहा कॅन्टींगचा व्यवसाय थाटून आज स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे.
एका खाजगी आरामशीनमध्ये दिवाणजी म्हणून सुरेश उरकुडे यांनी जवळपास ३० वर्षे काम केले. महिन्याकाठी त्यांना मालक ६ हजार रुपये पगार देत होते. तीन भावंडांच्या संयुक्त कुटूंबात राहणाऱ्या सुरेशला ६ हजार रुपये महिन्याला मिळत असायचे. मात्र कमी पगारावर कुटूंबातील सदस्यांच्या गरजा आणि मुलांच्या शिक्षणासाठी अपुऱ्या पैशातून कुटूंबाचं रहाट गाडगं नीट चालविणे सुरेशला शक्य नसल्याचे लक्षात आले.
एका मेळाव्यातील स्टॉलवरील पॉम्पलेट्समधून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेबाबतची माहिती सुरेशला मिळाली आणि गोंदियातील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेची शाखा सुरेशने गाठली. शिक्षण दहावीपर्यंत झाल्यामुळे व्यवहाराचे बऱ्यापैकी ज्ञान सुरेशला होते. या योजनेतून चहा कॅन्टीन सुरु करुन आपण चांगल्याप्रकारे स्वावलंबी होवू शकतो हा दांडगा विश्वास सुरेशचा होता. मुद्रा योजनेतील शिशु गटातून चहा कॅन्टीन व्यवसाय सुरु करण्यासाठी ५० हजार रुपये कर्ज घेतले. घेतलेल्या कर्जातून चहा कॅन्टीनसाठी शेड, कपबशी, चहा पावडर आणि गॅस सिलेंडर खरेदी केले. मोठे भाऊ ओमचंद चहा कॅन्टीनचा व्यवसाय पूर्वी छोट्या प्रमाणात करायचे. घर चौकातच असल्यामुळे चहा सोबत गरम नास्ता सुध्दा ठेवू लागलो. त्यामुळे परिसरातील लोक सकाळी चहा नास्त्यासाठी हमखास आजही येतात. परिसरात कुणाकडे विवाह प्रसंग व अन्य प्रकारचे कार्यक्रम असले तर त्या दिवसाच्या व्यवसायात चांगलीच वाढ होण्यास मदत होते. रविवारला देखील चांगली गर्दी दुकानात होत असल्याचे सुरेशने सांगितले.
चहा कॅन्टीन व नास्त्याच्या व्यवसायामुळे दर महिन्याला १० ते १२ हजार रुपये आज मिळत आहे. व्यवसाय उभा करण्यासाठी मुद्रा योजनेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड दुसऱ्याच महिन्यापासून करायला सुरुवात केली. जवळपास पावने दोन वर्षाच्या कालावधीत २५ हजार रुपयांची परतफेड बँकेला केली. आता लवकरच उर्वरित कर्जाची परतफेड बँकेला करणार असल्याचा आत्मविश्वास सुरेशने बोलून दाखविला.
आजपर्यंत कुठल्याही बँकेचे कर्ज काढले नसल्यामुळे सुरेशला कर्ज काढतांना भिती वाटायची. मात्र प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेमुळे व्यवसायातून स्वावलंबनाचा मार्ग सुरेशला सापडला. व्यवसायामुळे जीवनात स्थिरता आली. तीन भावंडाच्या संयुक्त कुटूंबातील ९ सदस्य आनंदाने एकत्र राहत आहेत. चहा कॅन्टीचा व्यवसाय मोठ्या स्वरुपात करायची इच्छा सुरेशने बोलून दाखविली. या कर्जाची परतफेड लवकर करुन आता किशोर गटातून २ लक्ष रुपये घेवून हा व्यवसाय वाढविणार असल्याचे त्याने सांगितले. आमच्या संयुक्त कुटूंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर आता पुर्णपणे अवलंबून असून घरच्या सर्व मुलांना चांगले शिक्षण देवून त्यांना नोकरीच्या दृष्टीने आतापासूनच तयारी करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सांगितल्याचे सुरेशने बोलून दाखविले. प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरेशच्या संयुक्त कुटूंबाला स्वावलंबनासाठी मदतीची ठरली.

Exit mobile version