Home यशोगाथा प्रगत महाराष्ट्राच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल मुख्य सचिवांकडून जि.प.सीईओंसह शिक्षणाधिकाऱ्यांचा सन्मान

प्रगत महाराष्ट्राच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल मुख्य सचिवांकडून जि.प.सीईओंसह शिक्षणाधिकाऱ्यांचा सन्मान

0

गोंदिया,दि.18 : ‘प्रगत महाराष्ट्र’ या धोरणाची गोंदिया जिल्हा परिषदेच्या (जि.प.) शिक्षण विभागाने तीन वर्षापासून प्रभावी अंमलबजावणी केली. यामुळे जि.प. शाळांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला. या गुणवत्तेची राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दखल घेऊन मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या हस्ते गोंदिया जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डाॅ.एम.राजा दयानिधी,शिक्षणाधिकारी उल्हास नरड व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांना शाल – श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रधान सचिव नंद कुमार यांच्यासह इतर अधिकारी सुध्दा उपस्थित होते. जिल्हातील शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्य शासन दखल घेत आहे. स्वयंपूर्णतेच्या दिशेने जि.प.च्या शाळांची पथदर्शी वाटचाल सुरु असल्याचे समाधान सीईओ दयानिधी यांनी व्यक्त केले. राज्यात २०१५ पासून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ धोरण आवलंबण्यात येत आहे. यानुसार १०० टक्के मुले शैक्षणिक दृष्ट्याप्रगत होणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक मुलाची भाषा आणि गणित विषयाची अध्ययन स्तर निश्चिती जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल झाल्या असून बहुतांश शाळांमध्ये ज्ञान रचनावादी शिक्षण सुरू आहे. कृती युक्त शिक्षण पद्धतीने विद्यार्थी शिकत असल्याने गणितीय क्रियेत मुलांची प्रगती होत असल्याचेही त्यांनी नमुद केले.

Exit mobile version