मोतसावंगा धरणाच्या सांडव्यात वाहून चार जणांचा मृत्यू

0
130

वाशीम,दि.22ः वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील धरणाच्या सांडव्यात चार जण वाहून गेल्याची घटना मोतसावंगा धरणावर मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली आहे. भाऊराव खेकडे (६५), दिलीप वाघमारे (३५), गोपाल जामकर (३0), महादेव इंगळे (३0), सर्व रा. मोतसावंगा अशी मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार मोतसावंगा येथील भाऊराव खेकडे (६५), दिलीप वाघमारे (३५), गोपाल जामकर (३0), महादेव इंगळे (३0), सर्व रा. मोतसावंगा हे शेतात गेले होते. परंतु घरी येत असताना तेथील धरणातील सांडव्यात मोठय़ा प्रमाणावर पाणी ओसंडून वाहत होते. या सांडव्यात उपरोक्त चारही जण वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्यावतीने विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. माहितीनुसार पाण्याच्या प्रवाहाचा वेग इतका होता की, दोघे जणांचा पाण्यात तोल गेला आणि ते वाहत गेले. त्यांना वाचवण्यासाठी इतर दोघांनीही उडी घेतली. पण तेही पाण्यात वाहून गेले. विशेष म्हणजे, या चौघांनाही धरणात पोहण्याचा अनुभव होता मात्र, पाण्याचा प्रचंड वेग असल्याने ते वाहून गेले. घटनेची माहिती सुरुवातीला गावकर्‍यांना मिळताच चारही जणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरले अगोदर त्यांना भाऊराव खेकडे यांचा मृतदेह सापडला तर इतर तिघांचेही मृतदेह दुपारी ४ च्या दरम्यान सापडले.
घटनास्थळी मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार किशोर बागडे आसेगांव पोलिस ठाण्याचे ठाणेदार खंडारे हे तळ ठोकून होते. तर जिल्हा परिषद सदस्य मोरे, पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत ठाकरे, वसंत भोंडणे, महादेव सातपुते व मोतसावंगा येथील गावकरी हजर होते. गावातील चार व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याने गावात शोककळा पसरली आहे. तर घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश होता. परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते.