Home Top News पुरात वाहुन मायलेकीचा मृत्यू

पुरात वाहुन मायलेकीचा मृत्यू

0

सालेकसा दि.१८: तालुक्यातील पिपरटोला येथील नाल्याच्या पुरात आईसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुली वाहुन गेल्या. दरम्यान मायलेकींचा मृत्यू झाला असून एका चिमुकलीला जिवनदान देण्यात गावकरी यशस्वी झाले. हृदयाला पाझर फोडणारी ही घटना आज (दि.१८) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पिपरटोला शिवारात घडली. मृतक आईचे नाव भुमेश्वरी बाबुलाल बिलोने (३२) रा.बिंझली आणि चिमुकलीचे नाव जयश्री (दीड वर्ष) असे आहे तर मृत्यूच्या जबड्यातून सुटलेल्या मुलीचे नाव भाग्यश्री (दीड वर्ष) असे आहे.
मृतक महिला भुमेश्वरी ही आपल्या माहेरी गोंदिया तालुक्यातील चांदणीटोला येथे गेली होती. आज दुपारच्या पॅसेंजरने गोंदियावरून जुड्या मुलींना घेऊन गावाकडे निघाली. धानोली रेल्वे स्थानकावर उतरून दोन्ही काळजाच्या तुकड्यांना कमरेवर आणि डोक्यावर सामान घेऊन बिंझली गावाकडे निघाली. रस्त्यात पिपरटोला जवळ नाला पडतो. या नाल्याला पुर होता. हा नाला पार करण्यासाठी भुमेश्वरीने भाग्यश्री आणि जयश्री या दोघींना कडेवर घेऊन पाण्यातून निघु लागली. दरम्यान पुराचा जोर अधिक असल्याने तिन्ही मायलेकी पुराच्या पाण्यात वाहल्या. यात आई भुमेश्वरी आणि एक चिमुकली जयश्री यांचा मृत्यू झाला. भुमेश्वरीचा मृतदेह गावकNयांनी काढला. तत्पूर्वी मृत्यूशी झुंज देणाNया भाग्यश्रीला जिवंत काढण्यात त्यांना यश आले. मात्र, वृत्त लिहीपर्यंत जयश्रीचा शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच राजस्व विभागातील मंडळ अधिकारी एम.बी.रघुवंशी तथा पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहचले. सालेकसा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. पुरात वाहलेल्या जयश्रीचा शोध गावकNयांसह पोलीस प्रशासन करत आहे. मायलेकींच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. एकाच घरातील दोघींना काळाने हिरावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने कुटुंबाला आर्थिक मदत करावी. अशी गावकNयांनी मागणी केली आहे.

Exit mobile version