‘एटीएसने जप्त केलेली ‘ती’ व्हाेल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधील व्यक्तीची’; राष्ट्रवादीचा आरोप

0
74

मुंबई – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. याबरोबरच दररोज फडणवीस या प्रकरणात नवीन गोष्टींचा उलगडा करत आहेत. आता फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी राष्ट्रवादीनेही पुढाकार घेतल्याचं दिसून येतंय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून दहशतवाद विरोधी पथकाने आज जप्त केलेली व्होल्वो गाडी ही देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाची असल्याचा आरोप केला आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनीष भतीजाची असल्याचं कळतंय. मनीष भतीजा हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्समधले बिल्डर आहेत. तसेच त्यांचे लागेबांधे हे भाजप नेत्यांकडे जात असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने पुढे फडणवीसांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री असताना नवी मुंबईतील 1,767 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 3.6 कोटी रूपयाला मनीष भतिजा या बिल्डरच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. असा संदर्भही दिला आहे.

मनीष भतीजा यांच्या पॅराडाईस ग्रुपला नवी मुंबई विमानतळानजीकची 24 एकर सोन्यासारखी जमीन पडलेल्या भावाने दिली. असा आरोप राष्ट्रवादीने फडणवीसांवर केला. त्याबरोबरच, मनीष भतिजा यांचे प्रसाद लाड हे व्यवसायिक पार्टनर असल्याचाही मोठा खुलासा या फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच ढवळुन निघालं आहे.