ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य व हार्बर रेल्वे ठप्प;मुंबईत जोरदार पाऊस

0
56

मुंबई, ०९ जून:-हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे.दुसरीकडे मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याचे दिसत आहे. यासह इतरही अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरल्यामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

हवामान खात्याचे डेप्यूटी डायरेक्टर जनरल, डॉ. जयंता सरकार यांनी सांगितले की, नेहमी मान्सून 10 ते 12 जूनदरम्यान येतो. पण, यंदा मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. यामुळे 9 ते 12 जूनदरम्यन मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये साचण्यास सुरुवात झाली आहे.

या भागांमध्ये पाणी साचले

मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे किंग सर्कल, सायन, अंधेरी, चेंबूर, बोरिवाली, कांदिवली आणि घाटकोपर परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. शिवाय, या पाण्यामुळे अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या महापालिका आणि पोलिस विभाग रस्त्यांवर तैनात आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. या महामारीच्या काळात पावसामुळे मुंबईकरांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.