Home Top News विजेच्या संकटामुळे ६७0 पॅसेंजर गाड्या रद्द- रेल्वेचा निर्णय

विजेच्या संकटामुळे ६७0 पॅसेंजर गाड्या रद्द- रेल्वेचा निर्णय

0

नवी दिल्ली- देशात सध्या विजेचे संकट मोठे आहे. वाढत्या उष्म्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी वीजगृहांतील भट्ट्या धगधगत आहेत. एप्रिलमध्ये विजेची मागणी अचानक वाढल्याने वीज निर्मिती प्रकल्पांत कोळसा टंचाई निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
मालवाहतुकीसाठी रेल्वे मार्ग मोकळा ठेवण्यासाठी रेल्वेने ६७0 प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. कोळश्याची मागणी पूर्ण करण्यासाठी, झारखंड, छत्तीसगड आणि इतर कोळसा उत्पादक राज्यांमधून रेल्वे गाड्या देशाच्या कानाकोपर्‍यातील वीज निर्मिती प्रकल्पांपयर्ंत कोळशाची वाहतूक करत आहेत. कोळश्याची ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा क्षेत्र तसेच रेल्वेवर ताण वाढला आहे. कोळश्याने भरलेल्या मालगाड्यांना मार्ग खुला करण्यासाठी रेल्वेने प्रवासी गाड्या रद्द करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे पयर्ंत ६७0 पॅसेंजर रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी ५00 हून अधिक गाड्या लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या आहेत. कोळसा मंत्र्यांनी नुकतेच सांगितले होते की, देशातील वीज केंद्रांमध्ये सरासरी १0 दिवसांचा कोळशाचा साठा उपलब्ध आहे. साठा राखीव ठेवण्याचे सरकारचे प्रयत्न आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने कोळसा वाहतूक करणार्‍या मालगाड्यांच्या संख्येत वाढ केली आहे. सध्या दररोज ४00 हून अधिक कोळसा वाहतूक करणार्‍या गाड्या धावत आहेत. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. कोळसा वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रेल्वेला एकूण ५८ वॅगन्स जोडलेल्या असतात. या ५८ वॅगन्सच्या गाडीला एक लोड अथवा एक रेक असे म्हटले जाते. यामधून सरासरी ३ हजार ५00 ते ३ हजार ७00 मेट्रिक टन कोळसा वाहून नेला जातो.

Exit mobile version