अनिल परब ईडीच्या रडारवर:शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी छापेमारी, मनी लॉड्रिंगचा आरोप

0
21

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. आज सकाळी 6.30 च्या सुमारास ईडीने ही छापेमारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिल परबांशी संबंधित 7 ठिकाणांवर ईडीने धाड टाकली आहे. अनिल परबांविरोधात ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेच्या अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आता अनिल परब यांच्यावर देखील ईडीने कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीने परबांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्स देखील बजावू शकते.

छापेमारीवेळी अनिल परबांचे शासकीय निवासस्थान अंजिक्य तारा येथे सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहे.
काय आहेत आरोप?

मनी लॉड्रिंगप्रकरणी यापूर्वीदेखील अनिल परबांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे. परिवहन विभागातील बदल्यांमध्ये गैरप्रकार करून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोपही अनिल परबांविरोधात करण्यात आला आहे. याप्रकरमी आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांचीदेखील ईडीने चौकशी केली होती. ईडीची आजची कारवाई याच प्रकरणाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप ईडीकडून याप्रकरणी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय बेनामी संपत्तीप्रकरणी काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाने परब यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात दापोली रिसॉर्टचादेखील समावेश होता. तसेच खरमाटे आणि वांद्रेतील परबांच्या सीएच्या घरीदेखील धाड टाकण्यात आली होती.

आता सगळं संपलं

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आज ईडीने परबांवर छापा टाकल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या म्हणाले की, सुरुवातीला अनिल देशमुख त्यानंतर नबाव मलिक आणि आता अनिल परब ईडीच्या गुन्ह्यात अडकले आहेत. अनिल देशमुखांनी देखील शेकटो कोटींचा घोटाळा केला आहे. संजय कदम हे अनिल परब यांचे पार्टनर असून त्यांच्या घरी सव्वातीन कोटी रुपये मिळाले होते. 25 कोटींचा बेनामी रिसॉर्ट उद्धव ठाकरेंचे मंत्रालय चालवत होते, मात्र आता सगळं संपलं आहे, असे सोमय्या म्हणाले.

काळे कारनामे बाहेर येणार

सचिन वाझेकडून येणाऱ्या 100 कोटींमध्ये देखील अनिल परब यांचे नाव होते. त्याचे सारे काळे कारनामे बाहेर येणार आहे. आता अनिल परबांनी बॅग भरायला हवी असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

माझी हत्या करण्याचा प्रयत्न

उद्धव ठाकरेंनी अनिल परब यांच्याद्वारे माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुण्याला माणसं कोणाची होती. वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये अनिल परब यांनी बोगस एफआयआर माझ्याविरोधात दाखल केली होती. अनिल परब यांच्याबरोबर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी देखील माफियागिरी सुरू केली आहे. त्यांना देखील आम्ही उत्तर देणार आहोत. असा इशारा देखील सोमय्यांनी दिला आहे.

या कारवाईचे स्वागत

ईडीने केलेल्या कारवाईचे स्वागत आहे. ही कारवाई यापुर्वी झाली पाहिजे होती. मुंबई मधल्या बदल्यांचा भ्रष्टाचार, मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार, वाझेंनी दिलेले स्टेटमेंट त्यामुळे या कारवाईचा आम्ही स्वागत करतो. या लोकांनी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांचे हजारो कोटी रुपये खाल्लले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

हा कायद्याचा भाग

मला वाटते ईडीसारखी यंत्रणा परिपूर्ण माहिती घेऊनच रेड टाकत असतील. धाडी पडणे हा कायद्याचा भाग आहे. त्यामध्ये काय निघेल हे आपल्यासमोर येईलच. आतापर्यंत ज्या ठिकाणी धाडी पडल्या त्यात काही ना काही तथ्य निघालेले आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई केली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

अनिल परबांनी बॅग भरावी: सोमय्या

अनिल परब यांनी आता आपली बॅग भरावी अशी उपरोधिक प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. अनिल परब यांच्यावर आता ईडीकडून अटकेची कारवाई होण्याचे संकेत सोमय्या यांनी दिले.

दोन महिन्यांपासून मलिक तुरुंगात

काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरही ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तब्बल दोन महिन्यांपासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. आता अनिल परब यांच्यावरही ईडीने थेट गुन्हाच दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. आता ईडीकडून अनिल परब यांना अटक केली जाणार का, हे पाहावे लागेल.

साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.