अमरावती,दि.09ः पावसाची वाट पाहणाऱ्या उभ्या महाराष्ट्रासाठी एक आनंदवार्ता. ज्याची वाट आपण पाहत आहोत, तो मान्सून अखेर राज्याच्या वेशीवर दाखल झालाय. इतक्या दिवस अरबी समुद्रात रेंगाळलेला मान्सून येत्या 48 तासांत दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पोहचण्यास परिस्थिती अनुकूल आहे. त्यानंतर मान्सूनची आगेकुच सुरू राहील, अशी माहिती अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी दिली.
शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
विदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेने कहर केला. पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनुक्रमे 46 आणि 44 अंशांपुढे कमाल तापमानाचा पारा गेला होता. अशात पेरणीपूर्व मशागत आटोपून सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
कधी येणार पाऊस?
10 जून : विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो.
11 जून : अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम, वर्धा, नागपूर व भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
12 आणि 13 जून : अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. उर्वरीत जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. तर वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली एक ते दोन ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
14 ते 16 जून : विदर्भात विखुरलेल्या स्वरुपात हलका ते मध्यम पाऊस राहील, असे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.