राज्‍यसभा निवडणूक:राज्‍यसभेच्‍या नाट्यमय रणधुमाळीमध्‍ये मविआचे 3 तर भाजपाचे 3 उमेदवार विजयी

0
115

भाजप आणि महाविकास आघाडीने एकमेकांच्या मतदार आमदारावर आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत बैठक घेतली. तब्‍बल साडेआठ तास मतमोजणी रखडली होती. बैठकीनंतर आयोगाच्‍या निर्देशानूसार शिवसेनेच्‍या सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले. त्‍यानंतर मतमोजणीस सुरुवात करण्‍याचे निर्देश दिले होते. मतमोजणी अखेर भाजपचे तीन उमेदवार तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

दरम्यान, भाजपच्या धनंजय महाडिकांचा हा विजय आणि शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव हा महाविकास आघाडीच्या, खासकरून शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. सहाव्या जागेसाठी मतदान करताना महाविकास आघाडीची सहा मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणीसांनी महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज समोर असतानाही अचूक स्ट्रॅटेजी आखली आणि विजय खेचून आणला.

आता विधानपरिषदेकडे लक्ष्य

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणताना भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडली आहेत. त्यामुळे आता दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया
पहिल्‍या क्रमांकाच्‍या मतानुसार आम्‍हीच जिंकलो आहोत. भाजपने जागा जिंकल्‍या असल्‍या तरी ते विजयी नाहीत. काही अपेक्षित बाहेरची मत न पडल्‍यामुळे आम्‍ही संजय पवार यांची जागा गमावली. निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला विजय ?

किंगमेकरच्‍या भूमिकेत असलेले देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्‍हटले की, हा विजय महाराष्‍ट्राच्‍या जनतेला समर्पित करतो. जे स्‍वत:ला महाराष्‍ट्र समजतात त्‍यांना आजचा निकाल चोख उत्‍तर आहे. ही विजयाची मालिका सुरु झाली असून आता खंडित होणारी नाही. भाजपचे तीनही नेते विजयी झाले आमच्‍यासाठी आनंदाचा क्षण आहे.हा विजय आम्‍ही आमचे लढवय्ये आमदार लक्ष्‍मण जगताप यांना समर्पित केला आहे.

मविआचे 3 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार जिंकले
पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीमध्‍ये महाविकास आघाडीचे 3 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
मविआ कडून संजय राऊत, प्रफुल्‍ल पटेल आणि कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी वियजी झाले आहेत.

त्‍याचबरोबर भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.

महाडिकांच्‍या विजयाचा जल्‍लोष
अत्‍यंत प्रतिष्‍ठेच्‍या आणि चुरशीच्‍या समजल्‍या गेलेली सहावी जागा धनंजय महाडिकांनी संख्‍याबळापेक्षा अधिक मतांनी जिंकल्‍यानंतर महाडिक यांच्‍या घरी जल्‍लोष सुरु केला. महाडिक कुटुंबियांनी गुलालाची उधळण केली.

कोणाला मिळाली किती मतं ?
इम्रान प्रतापगढी – 44
प्रफुल्‍ल पटेल – 43
संजय राऊत – 41
अनिल बोंडे – 48
पियुष गोयल – 47
संजय पवार – 33
धनंजय महाडिक – 42

सुहास कांदे यांची प्रतिक्रिया
मत बाद होण्‍याविषयी सुहास कांदे यांना विचारणा केली असता, कांदे असे म्‍हणाले की, माझे मत बाद झाले याविषयीचा आतापर्यंत तरी माझ्याकडे पुरावा आला नाही. परंतु हे जर खरे ठरले तर मी कोर्टात जाणार असल्‍याची प्रतिक्रिया त्‍यांनी दिली आहे.

सुहास कांदे यांचे मत बाद
शिवसेनेच्‍या सुहास कांदे यांचे मत ग्राह्य न धरता बाकी मतांची मोजणी सुरु करण्‍याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

का झाले सुहास कांदे यांचे मत बाद ?
निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेजची पाहणी केल्‍यानंतर सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले आहे. कांदे यांनी मतपत्रिकेची घडी केली नसल्‍याचे व्हिडिओमध्‍ये स्‍पष्‍टपणे दिसते. म्‍हणून आयोगाने कांदे यांचे मत ग्राह्य न धरता इतर मतांची मोजणी करण्‍याचे निर्देश दिले आहेत.