मुंबई,दि.25ः हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, मग बघूयात किती मते मिळतात, असे आव्हान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना केले. आधी नाथ होतो आता दास झाले, असाही हल्लाबोल ठाकरे यांनी केला. आज शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
बाळासाहेबाच्या नावाने शिंदे गट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यावर बाळासाहेबांचे नाव कोणी वापरू नये यासाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला जाणार आहे. शिवसेने कार्यकारिणीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत 5 ठराव मंजूर
- शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि राहिल.
- उद्ध ठाकरेंच्या नेतृत्वावर कार्यकारिणीचा विश्वास, पक्षात निर्णय घेण्याचे त्यांना सर्वाधिकार.
- शिवसेनेशी गद्दारी करण्यांवर कारवाई करण्याचे पक्षप्रमुखांना अधिकार.
- बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.
- शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी निवड करण्यात आली होती. तेव्हा बाळासाहेबांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारले होते. मी त्याचा मुलगा आहे, म्हणून मला पद दिले नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मला प्रेम लाभले. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम आहे.
शिवसेना अॅक्शन मोडमध्ये
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सुमारे 40 आमदारांनी बंड केल्याने राज्य सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेकडून वेगाने पावले उचलली जात आहे. शिवसेना मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. शिवसैनिकांना सेना भवनावर जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.