मुंबई-आठ दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तांतराच्या नाट्यात अखेर मंगळवारी (२८ जून) भाजपची अधिकृत एंट्री झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रात्री दहा वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ‘शिवसेनेच्या ३९ आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत न राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे अल्पमतात आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध (फ्लोअर टेस्ट) करण्यास सांगावे,’ अशी मागणी करणारे पत्र त्यांनी दिले. राज्यपाल आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी किती अवधी देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. बुधवारी (२९ जून) याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
फडणवीस सकाळीच दिल्लीला गेले होते. तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या ‘सागर’ बंगल्यावर राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांशी फडणवीसांनी चर्चा केली व त्यानंतर लगेचच हे नेते राजभवनावर गेले. या वेळी गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार हजर होते.
भाजपचे पत्र : सरकार अल्पमतात 1. भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणुका लढवल्या होत्या. परंतु निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. 2. गेल्या ८ ते ९ दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत संघर्ष उफाळून आला. या नेत्यांना आता काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी नको आहे. 3.शिवसेनेचे ३९ आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले. 4.दुसरीकडे शिवसेनेच्या या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांचे मृतदेहच परत येतील, असे जाहीरपणे खा. संजय राऊत सांगताहेत. 5. शिवसेनेचे इतरही नेते धमक्यांची भाषा बोलताहेत 6. लोकशाहीत बहुमत ही सर्वोच्च बाब आहे. त्याशिवाय सरकार अस्तित्वात राहू शकत नसल्याने तातडीने बहुमत सिद्ध करण्यास सांगावे.
३० जून रोजी बहुमत चाचणीच्या पसरल्या अफवा भाजपचे शिष्टमंडळ भेटायला गेले असताना राजभवनचे कथित पत्र व्हायरल झाले. त्यात ३० जून रोजीच ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याचे म्हटले होते. मात्र हे पत्र बनावट असल्याचा खुलासा राजभवनच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
दोन शक्यता बहुमत चाचणीवेळी शिंदेसेना गैरहजर राहिली तर? ठाकरे सरकारविरोधात मतदानाचा ठपका नको असेल तर बंडखोर शिवसेना आमदार अनुपस्थित राहिले तरी सरकार कोसळू शकते… विधानसभेचे एकूण सदस्य 288 दिवंगत सदस्य 01 कारागृहात सदस्य 02 सध्याची सदस्य संख्या 285 शिंदेसेना गैरहजर राहिल्यास -39 सभागृहाची सदस्य संख्या 246 बहुमताचा आकडा 124
भाजपचे संख्याबळ भाजप + अपक्ष = एकूण 106 + 27 = 133
महाविकास आघाडीचे संख्याबळ शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस = एकूण 16 + 51 + 44 = 111 बहुमत चाचणीवेळी शिंदेसेना हजर राहिली तर? भाजपच्या आग्रहास्तव शिंदेसेनेच्या सर्व आमदारांनी बहुमत चाचणीच्या वेळी उपस्थित राहून ठाकरेंविरोधात मतदान केले तर मविआ सरकार कोसळेलच.
विधानसभेचे एकूण सदस्य 288 दिवंगत सदस्य 01 कारागृहात सदस्य 02 सध्याची सदस्य संख्या 285 शिंदेसेना हजर राहिल्यास 39 सभागृहाची सदस्य संख्या 285 बहुमताचा आकडा 143
भाजपचे संख्याबळ भाजप + शिंदेसेना + अपक्ष = एकूण 106 + 39 + 27 = 172 महाविकास आघाडीचे संख्याबळ शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस = एकूण 16 + 51 + 44 = 111