
मुंबई-राज्य विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात एकनाथ शिंदे सरकारला १६४ मते मिळाली असली तरी राष्ट्रपती निवडणुकीत त्यात आणखी १० ते १२ मतांची वाढ व्हावी, अशा प्रयत्नात भाजप नेते आहेत. मंत्रिपदांवरून नाराजी होऊन आहे ती मतेही कमी होऊ नयेत म्हणून ११ किंवा १२ तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ १० मंत्र्यांचा शपथविधी करावा आणि १८ जुलैनंतर दुसरा विस्तार करावा, असे नियोजन भाजपकडून केले जात आहे.
राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी केला आहे. सर्व मतदारांकडून मतदानाची रंगीत तालीम करून घेतली जाणार आहे. महाराष्ट्राकडून भाजपच्या या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून १६४ या बहुमताच्या आकड्यापेक्षा १० ते १२ अधिक मते विधानसभेतून मिळावीत, असा त्यांचा प्रयत्न आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार केल्यस शिंदे गटातील ज्या आमदारांना मंत्रिपदाची आश्वासने मिळाली किंवा ज्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यांच्यापैकी काही मंत्री न केल्यामुळे नाराज होऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जाऊ शकतो.
भाजपला २९, शिंदेंकडे १४ मंत्री
एकानाथ शिंदे गटातील १४ आमदारांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे आणखी १३ जणांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. भाजपकडून ही संख्या २९ असेल. म्हणजे भाजपचे आणखी २८ आमदार मंत्री होऊ शकतील, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. यातील किती पदे केव्हा भरायची, काही जागा रिक्तच ठेवायच्या का, याबाबतदेखील निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येते.