
मुंबई: जनकवी शैलेंद्र यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संज्ञापन विभागातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सिनेगीतकार हसन कमाल आणि कवी शैलेंद्र यांचे चिरंजीव, दिग्दर्शक दिनेश शैलेंद्र हे हजर होते.
भारतीय सिनेमात चित्रपट गीतांना पटकथेचाच एक भाग म्हणून पाहिले जात होते. सिनेमाला अनुरूप अशा गीतांची निर्मिती होत असे. परंतु अलीकडच्या काळात सिनेगीतांना तत्वज्ञान किंवा साहित्य म्हणून बघण्याची सवय तुटल्यामुळे आजच्या सिनेगीतांची पातळी खालावली आहे, अशा शब्दांत कवी हसन कमाल यांनी चिंता व्यक्त केली. कवी शैलेंद्र यांच्या सारखा सिनेगीतकार आपल्याला मिळाला हे आपले भाग्य आहे असेही ते म्हणाले.
कवी शैलेंद्र यांचे चिरंजीव, दिग्दर्शक दिनेश शैलेंद्र यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या. आधीच्या काळात पैशासाठी गीते लिहिली जात नव्हती. साहित्यसेवा म्हणून सिनेमातली गीते लिहिली जात, त्यामुळे त्याचा दर्जा टिकून होता, असे ते म्हणाले.
विद्यापीठीय अभ्यासक्रमात शैलेंद्र आणि समकालीन इतर कवींचा अभ्यास सातत्याने विभाग करत असून त्यावर वेगवेगळ्या संशोधन देखील सुरू असल्याचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सागर भालेराव, अभिषेक शुक्ला,वासू ग्रोव्हर, दिशा रॉय चौधरी, अवनीत,कबीर यांनी विशेष मेहनत घेतली.