
औरंगाबाद –टीईटी घोटाळ्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे मुलींबरोबरच संस्थेतील आणखी पंधरा शिक्षकांचा समावेश असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला. या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत सत्तार यांना मंत्री पदावरून हटवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
गुणांसाठी सत्तारांकडून आर्थिक देवाणघेवाण
अंबादास दानवे यांनी आरोप केला की, टीईटी परीक्षेत कमी गुण असताना आर्थिक देवाणघेवाण करून गुण वाढवण्यात आले आहेत. यातील काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, शिंदे फडणवीस यांचे सरकार येताच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.
पंधरा शिक्षकांचे गुण वाढवले
दानवे म्हणाले, विशेष म्हणजे या घोटाळ्यात कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांच्या मुलींबरोबरच त्यांच्या मॉर्डन संस्थेतील आणखी पंधरा शिक्षकांचे अशाच प्रकारे टीईटी परीक्षेत गुण वाढवून भरती करण्यात आले आहेत. त्यांना पगारही दिला जातो आहे. त्यांची यादी व पगार केल्याचा पुरावा माझ्या हाती लागल्याची माहिती दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली व इतके उघड पुरावे असताना कॅबीनेट मंत्री सत्तार यांना अभय का दिले जात आहे?
भ्रष्ट मंत्र्यांना अभय
दानवे म्हणाले, भ्रष्ट मंत्र्याला पाठिशी घालण्याचे काम होत असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तोपर्यंत सत्तार यांना मंत्री पदावरून हटवावे. सत्तार यांच्या लोकांनी शिक्षण विभागात गोंधळ घातलाय. त्या टीईटी घोटाळ्यात मंत्र्याचे पाय खोलात असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारने तातडीने दखल घ्यावी. विधान परिषदेतही या विषयी प्रश्न विचारला होता. सरकारला समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. आता आणखी पुरावे आम्ही सादर करणार आहोत. त्याची चौकशी व्हावी, असे दानवे म्हणाले.
सत्तारांपुढील अडचणी वाढल्या
विधान परिषद विरोधी पक्षनेते दानवे यांनी मंत्री सत्तारांच्या संस्थेतील नव्याने पंधरा पेक्षा अधिक टीईटीतील शिक्षकांची नावे पुराव्यासह उघड केले आहेत. त्यामुळे सत्तार यांच्या समोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. तर गैरमार्गाने टीईटी परीक्षेत गुणी वाढवून शिक्षक झालेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होणे गरजेचे आहे.