नंदुरबार -तालुक्यातील धानोरा गाव मार्गे गुजरात राज्यात जाणाऱ्या रस्त्यावरील रंका नदीवरील असलेला पूल आज दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान कोसळला आहे. हा पूल मध्यभागी तडा पडून नदीत कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही दुर्घटना घडलेली नाही. राज्य महामार्ग क्रमांक सहा असलेला धानोरा रस्त्यावरील पूल कोसळल्याने पुन्हा एकदा राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे ढिसाळ काम चव्हाट्यावर आले आहे.
नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेलगत आहे चाळीस ते पन्नास किमी अंतरावर गुजरात राज्याची सीमा हद्द असल्याने नंदुरबार येथून बहुतांशी नागरिक गुजरातला जाण्यासाठी राज्यमार्ग क्रमांक सहा असलेल्या नंदुरबार तालुक्यातील धानोरा मार्गे जात असतात, त्यामुळे या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. परंतु राज्य महामार्ग सहा वर असलेल्या धानोरा गावाजवळील रंका नदीवरील पूल आज दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान अचानक पूल ढासळला. हा पूल मध्यभागून कोसळून नदीत पडला आहे.


सुदैवाने पूल कोसळण्यावेळी या मार्गावरून वाहन जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. रंका नदीवरील पूल कोसळल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील पूल कोसळला असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. नेहमी वर्दळीचा असलेल्या राज्य महामार्गावरील धानोरा रस्त्यावरून वाहने ये-जा करीत असतात. मात्र सुदैवाने सदरची वाहने यावेळी जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे राज्य महामार्गावरील पूल कोसळल्याने पुन्हा एकदा राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.