मुंबई-दसऱ्याच्या दिवशीच मुंबईतील वांदे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 ते 12 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सी लिंकवर पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. एका मागून एक गाड्या एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये चार कार आणि एका रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. अपघात एवढा भीषण होता की, यात चारही कारचा अक्षरश: चुराडा झाला.
कसा झाला अपघात?
सी लिंकवर रात्रीच्या सुमारास एका कारचा अपघात झाला होता. या अपघातातील जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका तिथे आली होती. मात्र मागून येणाऱ्या कार अचानक या रुग्णवाहिकेलाच धडकल्या.

अपघातानंतर मार्ग बंद
अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना वेगवेगल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

वाहनांचे मोठे नुकसान
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या भीषण अपघातांमध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
