
नागपूर:भुसावळ विभागातील जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे काम सुरू असल्याने नागपूरहून मुंबई, पुणे, गोवा, अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या चार दिवस रद्द करण्यात आल्या आहे. ३ ते ६ डिसेंबर या कालावधीत या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची अडचण होणार आहे. मात्र या मुद्यावरुन बहुजन समाज पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर वेगळाचा आरोप केला आहे.मध्य रेल्वे नागपूर विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) यांना यासंदर्भात निवेदन दिले जाणार आहे आणि मागणी केली जाार आहे की, ३ ते ६ डिसेंबरला मुंबई मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या सुरू ठेवून रेल्वे मार्गाचे काम १० ते १३ डिसेंबरच्या दरम्यान करावे. या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्यावतीने केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार व मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक, मुंबई यांना निवेदन पाठविले जाणार आहे.
जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या काम सुरू असल्याने नागपूरहून मुंबई, पुणे आणि नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या तीन दिवस रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ३ ते ६ डिसेंबर या काळात पुणे, मुंबई, अहमदाबाद, गोवाचा प्रवास करणार असणाऱ्यांची अडचण होणार आहे. ०११३९ नागपूर -मडगाव एक्स्प्रेस ३ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे. १२११४ नागपूर -पुणे एक्सप्रेस, २२१३७ नागपूर- अहमदाबाद एक्सप्रेस, १२१०५ सीएसएमटी- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, ०११४० मडगाव-नागपूर एक्सप्रेस ४ डिसेंबरला धावणार नाही. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस, १२११३ पुणे-नागपूर गरीब एक्सप्रेस, १२१४० नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस, १२१३९ सीएसएमटी- नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, २२१३८ अहमदाबाद-नागपूर एक्सप्रेस, ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, १२१०६ गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस ५ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे. तर ६ डिसेंबरला १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही गाड्यांचे मार्ग वळवले
बिलासपूर – हापा एक्सप्रेस, हावडा – अहमदाबाद एक्सप्रेस,सेंट्रल – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, पुरी-ओखा द्वारका एक्सप्रेस, पुरी-सुरत एक्सप्रेस, पुरी-गांधीधाम एक्सप्रेस, संत्रागाछी – पोरबंदर कवी गुरु एक्सप्रेस ४ आणि ५ डिसेंबरला बडनेरा जंक्शन-भुसावळ चोरड- खांडवा-इटारसी जंक्शन- भोपाळ जं- रतलाम जंक्शन-छायापुरी मार्गे वळण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारवर बसपाचा आरोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी मुंबईला जाऊन अभिवादन करणाऱ्या लाखो अनुयायांना थांबवण्यासाठी, तसेच अनेक वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या इंदू मिलच्या जागेवरील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाचे बिंग फुटू नये म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेल्वे मंत्रालयाने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचे षडयंत्र केले. या षडयंत्राचा भाग म्हणून ३ डिसेंबर ते ६ डिसेंबरच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या रद्द केल्या, असा आरोप बसपाचे उत्तम शेवडे यांनी केला आहे.