Home Top News स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. 8:-“स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. या शक्तीचा आदर करूया. त्यांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊया,’ असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“मुलींनीही आपल्यातील या शक्तीला ओळखून संधींची नवी क्षितिजे ओलांडण्याची हिंमत बाळगावी. त्यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल,’ असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या दिनाच्या पूर्वसंध्येला दिला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संदेशात म्हटले आहे की, ” आपल्या संस्कृतीने स्त्रीला मोठा सन्मान दिला आहे. मातृशक्ती म्हणून स्त्रियांनीच या राष्ट्राचे भवितव्य घडवले आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्यापासून ते स्त्रीशिक्षणाचा पाया घालणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन अनेक माता-भगिनींनी विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली आहे. शासन म्हणून महिला विकासाच्या अनेक योजना, उपक्रम, प्रकल्प राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे एक लाख डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यात देखील आपल्या महिला शक्तीचा समसमान वाटा असणार आहे. त्या दृष्टीने आपण विकासाची धोरणे आखत आहोत. आपल्या मुलींना शिक्षण, रोजगार, उद्योजकता अशा सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुलींनीही नवनव्या क्षेत्रातील संधी आजमावण्याची हिंमत बाळगावी.

यंदा जागतिक महिला दिनाचे घोषवाक्य ‘समानता स्वीकारा’ असे आहे. या दिशेने आपल्या देशात आणि राज्यात या आधीच प्रयत्न सुरू झाले आहेत. ही समानता प्रस्थापित करणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ती ओळखून स्त्रियांचा आदर करूया, त्यांना बरोबरीचे स्थान देऊया. हाच स्त्रीशक्तीचा जागर ठरेल. जागतिक महिला दिनाच्या माता-भगीनींना मनापासून शुभेच्छा!

Exit mobile version