Home Top News अमृता फडणवीस शुद्ध, पवित्र, पण लाच देण्याचा प्रयत्न करणारे स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले...

अमृता फडणवीस शुद्ध, पवित्र, पण लाच देण्याचा प्रयत्न करणारे स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले कसे?;दैनिक ‘सामनातू’न सवाल

0

मुंबई :-राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून आजच्या दैनिक ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आली आहे.अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला हे प्रकरण गंभीर आहे. अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी लाच देण्याचा प्रयत्न करणारे थेट स्वयंपाक घरापर्यंत पोहोचलेच कसे? असा सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. यावेळी फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यावरही अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून लाच आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. जरी अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे. प्रश्न इतकाच आहे की, या प्रकरणातील जे कोणी लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी?, असा सवाल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

महाराष्ट्राची प्रतिमा कोसळले

राज्यात सध्या लाच हा शब्द परवलीचा झाला आहे. राज्यात लाच देणे आणि घेण्याचं कुणाला काही वाटतद नाही. महाराष्ट्राची तशी प्रतिमा तयार झाली आहे. गौतम अदानींच्या भ्रष्टाचारावर महाराष्ट्र गप्प आहे. त्यामुळे या राज्यात काहीही घडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्र साफ कोसळेल आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जातील, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

भ्रष्टाचाराचे कुरण फुललंय

कांद्याच्या प्रश्नावरूनही अग्रलेखातून सरकारला घेरलं आहे. राज्यात कांदा प्रश्न पेटला आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून निषेध नोंदवला आहे. पण सरकारचं अजूनही नाकाने कांदे सोलणे सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड झाली. पण आधीच्या सरकारने काय केले? असा सवाल करत फडणवीस जुनीच रेकॉर्ड वाजवत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. त्यांची चौकशी केली जात आहे.सूडाचे राजकारण सुरू आहे. केवळ मिंधे गटात सामील न झाल्याने कारवाई केली जात आहे. त्याची शिक्षा त्यांना दिली जात आहे. आता यावर फडणवीस हे नाकाने कांदे सोलत सांगतील की, ‘कर नाही त्याला डर कशाला?’ फडणवीस तुमचे बरोबर आहे, पण ‘डर’ आम्हाला नसून तुमच्या लोकांना आहे आणि तुमच्याच संरक्षणाखाली भ्रष्टाचाराचे कुरण फुलले आहे, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.

‘मुका’ प्रकरणातले सत्य का शोधले नाही?

तुमच्या नाकासमोर भ्रष्टाचार घडला. पण तुम्ही आरोपींना वाचवत आहात. हेच काय तुमचे कायद्याचे राज्य? कर नाही त्याला डर कशाला? हे आमदार कुल यांच्यासारख्यांना सांगितलेत तर बरे होईल, पण भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याचेच तुमचे धोरण आहे, अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील मुकाप्रकरणावरूनही फडणवीस यांना धारेवर धरलं आहे. ‘मुका’ प्रकरणातील मुख्य आरोपी राहिले बाजूला, उलट राजकीय विरोधकांवरच कारवाई केली जात आहे.पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांनासुद्धा कायद्याने शिक्षा व्हायला नको काय? कोणत्याही अश्लील कृतींमुळे समाजाला त्रास होत असेल तर तो भारतीय दंडसंहितेच्या कलम 294 अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे. मुंबई पोलीस अॅक्ट कलम 110 नुसारदेखील हा गुन्हा आहे. मग राज्याच्या गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून ‘मुका’ प्रकरणातले सत्य का शोधले नाही?, असा सवाल यावेळी करणअयात आले आहे.

गृहमंत्रालय नाकाने कांदे सोलत बसले

ठाण्यातील एक पालिका अधिकारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने धमक्या देतो. त्यांना ठार मारण्याची सुपारी थेट अमेरिकेत देतो आणि तुमचे गृहमंत्रालय नाकाने कांदे सोलत बसलेय, असा हल्ला दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ‘खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत, असा जोरदार हल्लाही करण्यात आला आहे.

Exit mobile version