गोंदिया,दि.४- गेल्या २ तारेखला ओडिसा राज्यातील बालासोर रेल्वे स्थानकानजिक झालेल्या दुर्दैवी भीषण अपघातात अनेक जणांचा नाहक बळी गेला तर अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या अपघातातील पीडितांविषयी एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी आपली संवेदना व्यक्त केली आहे. या अपघातातील पिडीत पॉलीसीधारकांच्या दावा संदर्भात एलआयसीने अनेक शिथिलता जाहिर करून मानवतेचे दर्शन घडविले आहे.
एलआयसीच्या गोंदिया शाखेतील एमडीआरटी अभिकर्ता सुरेश भदाडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, ०२-०६-२०२३ रोजी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातामुळे एलआयसी ऑफ इंडियाला अतीव दु:ख झाले असून एलआयसी ऑफ इंडिया बाधितांना मदत करण्यास कटिबद्ध आहे आणि आर्थिक दिलासा देण्यासाठी दाव्यांचा निपटारा जलद गतीने करेल. एलआयसीचे अध्यक्ष श्री. सिद्धार्थ मोहंती यांनी पीडितांप्रती दु:ख व्यक्त केले आहे. तसे पत्र एलआय़सी कडून प्रकाशित करण्यात आले आहे.
एलआयसीचे चेअरमन मोहंती यांनी एलआयसी पॉलिसीआणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या दाव्यांची अडचण कमी करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या. मृत्यूप्रमाणपत्रांच्या बदल्यात रेल्वे प्रशासन, पोलिस किंवा कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या यंत्रणांनी प्रकाशित केलेल्या मृतांची यादी मृत्यूचा पुरावा म्हणून स्वीकारली जाईल. दाव्याशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आणि दावेदारांना मदत देण्यासाठी विभागीय आणि शाखा स्तरावर विशेष हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बाधित कुटुंबांपर्यंत दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. अधिक मदतीसाठी दावेदार जवळच्या शाखा / विभाग / ग्राहक क्षेत्रांशी संपर्क साधू शकतात.दावेदार आमच्या केंद्रावर देखील कॉल करू शकतात 02268276827