उमरखेड- तालुक्यातील निंगणूर येथे आईने आपल्या दोन चिमुकल्या आपत्यांना विष पाजून स्वतःचेही जीवन संपविले. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन्ही अपत्यांचा मृत्यू झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.रेशमा नितीन मुडे (२६) श्रावणी नितीन मुडे (६) आणि सार्थक नितीन मुडे (३) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रेशमा मुंडे यांनी आपल्या निरागस आपत्यांना विष पाजले आणि त्या नंतर स्वतः विष प्राशन केले अशी माहिती मिळाली आहे. काही वेळानंतर कुटुंबातील सदस्यांना ही बाब लक्षात आली. रेशमा, श्रावणी आणि सार्थक या तिघांनाही तातडीने सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु तोपर्यंत आई रेशमा आणि चिमुकल्या सार्थकचा मृत्यू झाला होता.अत्यवस्थ असलेल्या श्रावणीला पुढील उपचारासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा खुलासा अद्याप होऊ शकला नाही. गावात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. विष घेतल्यानंतर तिघांनाही सासरच्या लोकांनी सवना येथे उपचारासाठी आणले होते. मात्र रेशमाच्या माहेरच्या लोकांना ही बाब कळाली आणि ते सवना येथे दाखल झाले. त्यानंतर सासरच्या लोकांनी तेथून पोबारा केला. या घटनेला आणखी कोणी जबाबदार आहे याविषयी शंका व्यक्त होत आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.