
भंडारा -जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खंदाड या गावातील शेतात बुधवारी वाघ मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती कळताच पोलीस आणि वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.तुमसरपासून २८ किलोमीटर अंतरावरील वनपरिक्षेत्रालगतच्या धानाच्या शेतात बुधवारी, १६ ऑगस्टला सकाळी १०.३० च्या सुमारास गस्तीदरम्यान वनरक्षकांना जनावराचा मृतदेह कुजल्याचा वास आला. त्यांनी शोध घेतला असता लगतच्याच धानाच्या शेतामध्ये वाघाचा मृतदेह आढळला. हा मृतदेह झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवण्यात आला होता. त्यांनी संबंधित शेतकऱ्याकडे विचारणा केली असता येथे वाघ आधीच मृतावस्थेत असल्याचे सांगण्यात आले. भीतीपोटी आपण तो झाकून ठेवल्याचे त्याने सांगितले. आठ ते दहा दिवसांपूर्वीच वाघाचा मृत्यू झाला असावा, असा वनखात्याचा अंदाज आहे. चौकशी सुरू आहे.