एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका

0
14

️️उपचारासाठी एअर अँम्ब्यूलन्सने तातडीने मुंबईत

जळगाव:- राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. खडसे हे जळगावातील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे.त्यानंतर एकनाथ खडसे यांना उपचारासाठी एअर अँम्ब्यूलन्सने मुंबईत आणण्यात येणार आहे. एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा दौऱ्यावर असून त्यांनी एकनाथ खडसेंना मुंबईत आणण्यासाठी विशेष एअर अँम्ब्यूलन्सची व्यवस्था करून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार एकनाथ खडसे हे एक कार्यक्रम आटोपून जळगावातील निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आज दुपारी त्यांना अचानक छातीत त्रास व्हायला लागला. यावेळी एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच त्यांच्या कुटुंबियांना त्यांना जळगावातील गजानन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचार सुरू असातनाच रोहिणी खडसे यांनी खडसेंना हार्ट अटॅक आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंना तातडीने मुंबईत आणण्यासाठी एअर अँम्ब्यूलन्सची व्यवस्था करून दिली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ खडसे यांना छातीत दुखण्याचा त्रास होत होता. त्यानंतर आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने मुंबईत हलवण्यात येणार आहे.