Home Top News दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

0

वर्धा, दि. २६ – दोन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ही हृदयद्रावक घटना समुद्रपूर तालुक्यातील किन्हाळा या गावात घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये तुषार गजानन अवचट (५), अनुष्का गजानन अवचट (९) व पूनम गजानन अवचट यांचा समावेश आहे.
किन्हाळा येथील दादाजी अवचट यांचा एकमेव मुलगा गजानन यांचा राळेगाव तालुक्यातील वणोजा येथील हनुमान उगेमुगे यांची मुलगी पुनम सोबत १० वर्षापुर्वी विवाह झाला होता. या कालावधीत त्यांच्या संसाराच्या वेलीवर अनुष्का (९) व तुषार (५) ही दोन फुले उमलली. सुखात संसार सुरू होता. अनुष्का हिंगणघाटच्यास गुरूकुल कान्व्हेंटमध्ये दुसऱ्या वर्गात जात होती. तर तेथेच तुषार नर्सरीमध्ये जात होता. घरी ८ एकर शेती, गजानन एकटाच असल्याने संपूर्ण शेतीचा कारभार गजाननची पत्नी पुनम पाहायची. मात्र यातच कुणाची तरी नजर लागावी याप्रमाणे घरामध्ये सासु-सासराच्या वादामुळे पुनमने दोन्ही मुलासह आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सासरे दादाजी अवचट व सासु ही अर्धांग वायुने आजारी आहे. मात्र या दोघामध्ये कश्याच्या तरी संबंधात वाद झाला. तेव्हा पुनमला वाटल की लोक म्हणतील सुनेमुळेच सासुसासरे भांडतात व त्याचेच तिच्या डोक्यात घर केले होते, असेही बोलले जात आहे.
सोमवारी सकाळी तुषार हा शाळेत गेला होता तर मुलगी अनुष्काला तीने शाळेत जाण्यासाठी मनाई केली होती. मुलगा शाळेतून आल्यावर जेवन घेतले व ३ वाजताचे दरम्यान बाहेर खेळत असलेल्या तुषार व अनुष्काला घेवून पुनम शेताकडे निघाली. तेव्हा रस्त्यात गावातील एक म्हातारा भेटला तेव्हा त्याने विचारपूस केली. पाऊस येण्याची शक्यता आहे व यामध्ये मुलांना घेवून कुठे जात आहे. तेव्हा शेतात जाऊन येते, असे तीने सांगितले व पुढे जाऊन पुंडलिक बदकल यांचे शेतातील विहिरीत मुलासह उडी घेवून आत्महत्या केली.
सदर महिलेचा शोध घेतला असता आज तिघाचेही मृतदेह विहिरीत आढळून आले. घटनास्थळ गावापासून दोन किलोमिटर अंतरावर आहे. तीथे संपूर्ण गाव विहिरीवर गोळा झाले होते. विहिरीत तरंगत असलेल्या गोंडस मुलांकडे पाहून महिला हंबरडा फोडत होते.पुनमच्या माहेरच्या मंडळींनी आक्षेप नोंदवित घरच्याच्या त्रासापायीच आत्महत्या केली. तिला तिच्या कुटुुंबियांनी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची वडील हनुमान उगेमुगे यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार रणजितसिंह चव्हाण यांचे मार्गदर्शनात समुद्रपूर पोलीस करीत आहे.

Exit mobile version