Home Top News छत्तीसगढ येथील नक्षली हल्ल्यात वर्धा येथील जवान शहीद

छत्तीसगढ येथील नक्षली हल्ल्यात वर्धा येथील जवान शहीद

0

वर्धा,दि.12:- छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 11 सीआरपीएफ जवान शहीद झालेत. भेज्जी परिसरात सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सोनोरा (ढोक),( ह मु नाचणगाव )येथील प्रेमदास मेंढे हा जवान शहीद झाला आहे. सर्व शहीद जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते.
अत्यंत गरीब परिस्थितीतुन प्रेमदास मेंढे पुढे आलेत. त्यांचे वडील नाचणगाव येथे आजही हातमजुरी करतात. प्रेमदास मेंढे हे तीन भावांपैकी सर्वात धाकटे. अतिशय मनमिळावू आणि हसतमुख स्वभावाचे प्रेमदास हे सुमारे 15 वर्षापासून केंद्रिय राखीव पोलीस बलात कार्यरत होते.यापूर्वी त्यांनी गडचिरोली, श्रीनगर, पुणे,तळेगाव येथे काम केले. दोन वर्षांपूर्वीच त्यांची छत्तीसगढ येथे बदली झाली होती.
मागच्या महिन्यातच ते कुटुंबियांच्या भेटीसाठी घरी आले होते. 19 फेब्रुवारी रोजी ते पुन्हा देशसेवेच्या कार्यात रुजू झालेत. आज झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी ते शहीद झालेत. त्यांच्या मागे आई – वडील पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ तसेच मोठा आप्त परिवार आहे.
आज आणणार पार्थिव
प्रेमदास मेंढे या शहिद जवानाचे पार्थिव आज सकाळी रायपूर येथून वर्धा येथे विमानाने आणण्यात येणार आहे. वर्धा येथून गाडीने ते नाचाणगाव येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येईल. नाचाणगाव येथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Exit mobile version