Home Top News मध्य प्रदेशातही कर्जमाफीसाठी आंदोलन, गोळीबारात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू

मध्य प्रदेशातही कर्जमाफीसाठी आंदोलन, गोळीबारात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू

0
भोपाळ(वृत्तसंस्था),दि.06– महाराष्‍ट्रापाठोपाठ मध्‍य प्रदेशात पेटलेल्‍या शेतकरी आंदोलनात हिंसक घटना वाढल्‍या आहेत.शेतीमालाला योग्य भाव आणि शेतकरी कर्जमाफीसह अनेक मागण्‍यांसाठी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या एका गटासोबत सरकारने चर्चा केल्यानंतर दुसऱ्या गटाने संप कायम ठेवला आहे. दरम्यान आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. रतलाममध्‍ये रविवारी दगडफेकीत एका पोलिस अधिकाऱ्याचा डोळा फुटला होता.आज मंगळवारला मंदसौरमध्‍ये आंदोलकांनी 8 ट्रक आणि 2 बाइक आगीच्या भक्षस्थानी दिल्या. पो‍लिस आणि सीआरपीएफवर दगडफेक केली. संतप्त आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी सीआरपीएफने गोळीबार केला. यात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्‍ये कन्‍हैयालाल पाटीदार (रा. चिलोद पिपलिया) आणि बंटी पाटीदार (रा. टकरावद) यांचा समावेश आहे. मंदसौरमध्‍ये सोमवारी इंटरनेट सेवा बंद करण्‍यात आली.
 सहा दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. सोमवारी मध्यप्रदेशातील शेतकरी हिंसक झाले. मंदसौरमधील दलौदामध्ये काल (सोमवारी) रात्री 1000 हून जास्त आंदोलकांनी रेल्वे गेट तोडले. त्याचप्रमाणे रेल्वे रुळही उखडून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. आंदोलकांना ताब्यात घेतले.
नीमच, रतलाम, धार आणि मंदसौरसह परिसरात शेतकर्‍यांचा उद्रेक सुरू होता. संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रु धुराचा वापर केला. रतलाम येथे झालेल्या दगडफेकीत एका पोलिस अधिकाऱ्याचा डोळा फुटला. सीहोर येथे संतप्त शेतकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यासह दोन ठाणे अंमलदार आणि 11 पोलिस जमखी झाले. ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळ करत आंदोलनाने हिंसक रुप धारण केले. मात्र आंदोलन हिंसक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण चर्चेला तयार झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उज्जैनमध्ये भारतीय किसान संघांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या. या बैठकीनंतर किसान संघ आणि किसान सेना यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मात्र रविवारी उशिरा रात्री किसान युनियन आमि किसान मजदूर संघ यांनी संप सुरुच ठेवण्याचे जाहीर केले.

Exit mobile version