Home Top News दलालांपासून “डिफेन्स बजेट’चे संरक्षण करणार

दलालांपासून “डिफेन्स बजेट’चे संरक्षण करणार

0

पुणे- “निधीचा अनावश्यक अपव्यय आणि दलालीमुळे संरक्षण मंत्रालयाच्या बजेटचे मोठे नुकसान होते. ही स्थिती जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत २ लाख ३० कोटींचे बजेटसुद्धा अपुरेच पडेल. त्यामुळे दलाली आणि अनावश्यक खर्चाला कात्री लावून उपलब्ध निधीचा परिणामकारक वापर करण्यावर भर देणार आहे, अशी माहिती देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.

“देशापुढील वाढत्या आव्हानांचा विचार करता संरक्षण खात्याच्या बजेटमध्ये भरघोस वाढ व्हायला हवी यात शंकाच नाही. मात्र, बेताची आर्थिक सद्यस्थिती लक्षात घेता संरक्षण खात्याचे बजेट किती वाढेल, हे आताच सांगता येणार नाही,” असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. संरक्षण अधिकाऱ्यांची बैठक, सैन्याच्या दक्षिण मुख्यालयाला भेट यासाठी पर्रीकर गुरुवारी पुण्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दलालीमध्ये किती पैसा खर्च होतो याची सर्वांनाच माहिती असल्याची टिप्पणी पर्रीकर यांनी केली. ते म्हणाले, की संरक्षण खात्याला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाच्या सध्याच्या क्रयशक्तीमध्ये वीस टक्के वाढ करण्यात यश आले, तरी ही खूप मोठी वाढ ठरेल. संरक्षण खात्याला आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे. संरक्षण विभागाची गरज भागवण्याच्या दृष्टीने “मेक इन इंडिया’ या संकल्पनेचाही आम्ही सर्वंकष विचार करत आहोत, असेही संरक्षण मंत्र्यांनी या वेळी सांगितले.

कँटोन्मेंटचे रस्ते खुले
“कँटोन्मेंट विभागातील रस्त्यांबद्दलचे ७२ प्रस्ताव देशभरातून माझ्याकडे आले होते. कँटोन्मेंटमधील नागरी रस्त्यांवरील वाहतूक सुरू करावी. कायदेशीर प्रक्रिया न करता बंद करण्यात आलेले रस्ते महिनाभरात खुले करावेत, अशा सूचना मी नुकत्याच दिल्या आहेत.’
मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री.

Exit mobile version